नवी दिल्ली :भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) 19 जून रोजी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज रासिख सलाम याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. वयासंदर्भात खोटी माहिती पुरवल्याच्या आरोपात दोषी आढळल्याने बीसीसीआयने रासिख सलामवर कारवाई केली. रासिख इंडियान प्रीमियर लीग (IPL) 2019 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळत होता.
आगामी अंडर-19 सामन्यांमध्ये रासिखच्या जागी प्रभात मौर्या याला स्थान दिले आहे. येत्या 21 जुलैपासून इग्लंडमध्ये अंडर-19 क्रिकेट सामने सुरु होणार आहेत. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रक काढून रासिखच्या जागी प्रभात मौर्याला संधी दिल्याची माहिती दिली.
बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलंय की, “अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने 21 जुलैपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या अंडर-19 सामन्यांसाठी रासिखऐवजी प्रभात मौर्याला खेळवले जाईव. वयासंदर्भात चुकीचे कागदपत्र पुरवल्याच्या आरोपात दोषी आढळल्याने रासिखला दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.“
भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाची 9 जून रोजी निवड झाली. या संघात रासिख सलामचा समावेश करण्यात आला होता. भारताची ज्युनियर टीम इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची वन डे सीरीज खेळणार आहे.
2019 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून रासिख सलाम मैदानात उतरला होता. वेगवान गोलंदाज म्हणून त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. मुंबई इंडियन्सने रासिखला 20 लाख रुपयात खरेदी केले होते. जम्मू-काश्मीरमधून आयपीएलमध्ये खेळण्याचा मान मिळवणारा रासिख तिसरा खेळाडू ठरला होता. याआधी परवेज रसूल आणि मंजूर दार हे आयपीएलमध्ये खेळले होते.
रासिख सलाम दक्षिण काश्मीरमधील अशुमुजी गावात राहणार असून, या ठिकाणी कायम कर्फ्यू असतो, वीजही नसते.