नवी दिल्ली: आयपीएलमधील नवीन फ्रेंचायझी असलेल्या लखनऊ संघाने (Lucknow franchise) माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. इंडियन प्रिमीयर लीग 2022 च्या सीझनमध्ये गौतम गंभीर लखनऊ संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कोलकत्ता नाईट रायडर्सचे माजी कर्णधार असलेल्या गौतम गंभीर यांना लखनऊ संघाचे मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. संघाचे मालक संजीव गोएंका यांनी स्वत: शनिवारी ही माहिती दिली.
गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली केकेआर संघाने दोन वेळा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. आयपीएलनच्या 154 सामन्यात गंभीरने 31.23 च्या सरासरीने 4217 धावा केल्या आहेत. यात 36 अर्धशतकांचा समावेश आहे.
2011 साली कर्णधार म्हणून गौतम गंभीर केकेआर संघासोबत जोडले गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली केकेआरची गणना बलाढ्य संघांमध्ये होऊ लागली. 2012 आणि 2014 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली केकेआरने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली.
आयपीएलमध्ये पुन्हा संधी दिल्याबद्दल गंभीरने गोएंका आणि आरपीएसजी समूहाचे आभार मानले आहेत. विजयाची भूख अजूनही माझ्यामध्ये कायम असल्याचे गंभीरने म्हटले आहे. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार अँडी फ्लॉवरची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजीव गोएंका यांनी गंभीरच्या निवडीची घोषणा केली.
केएल राहुलने पंजाब संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर फ्लॉवर यांनी सुद्धा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. केएल राहुल लखनऊ संघाकडून खेळण्याची शक्यता असून त्याची कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते.
संबंधित बातम्या:
Ind vs SA: रोहितच्या जागी उपकर्णधार कोण? प्रश्नाचं उत्तर मिळालं, ‘या’ खेळाडूवर सोपवली जबाबदारी
IND vs SA: द्रविड-विराटच्या टीममध्ये झाला जोरदार सामना, दक्षिण आफ्रिकेत दिसला ‘चक दे इंडिया’चा सीन
न्यूझीलंडच्या 34 वर्षाच्या गोलंदाजाचा कहर, प्रतिस्पर्धी संघाची सपशेल शरणागती