मुंबई : बॉर्डर गावसकर मालिकेतील दुसरी कसोटी संपल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियातील काही खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यात केएल राहुलच्या फॉर्मबाबत वाद रंगला आहे. असं असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला स्थान मिळणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यात केएल राहुलचं उपकर्णधारपद गेल्याने तिसऱ्या कसोटीत आराम दिला अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. इतका सर्व वाद रंगला असताना कर्णधार रोहित शर्मानं याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. केएल राहुलला उपकर्णधारपदावरून दूर करणे कसलेच संकेत नाहीत, असं रोहित शर्माने सांगितलं.
“मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की, खेळाडू असा कठीण प्रसंगातून जातात. त्यासाठी त्यांना सिद्ध करण्यासाठी योग्य वेळ देणं गरजेचं आहे. उपकर्णधार असणं किंवा नसणं यातून काही संकेत मिळत नसतात. तो जरी उपकर्णधार नसला तरी सिनिअर खेळाडू आहे. त्याला उपकर्णधारपदावरून दूर केल्याने तसं काही होतं असं नाही. त्यामुळे प्लेईंग 11 तुम्हाला नाणेफेकीचा कौल झाल्यानंतरच कळेल.”, असं रोहित शर्माने सांगितलं.
“केएल राहुल आणि शुभमन गिल दोघंही सराव करत आहे आणि हा आमच्या दैनंदिन जीव खनाचा भाग आहे. आजच्या सरावात आम्ही सर्व 17 ते 18 खेळाडूंनी भाग घेतला होता. हा काय राहुल आणि गिलचा प्रश्न नाही. दुसरीकडे प्लेईंग 11 बद्दल बोलायचं तर आम्ही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. शेवटच्या क्षणाला कोण दुखापतग्रस्त होईल सांगता येत नाही. त्यामुळे नाणेफेकीपर्यंत धीर धरा.”, असंही रोहित शर्माने पुढे सांगितलं.
पहिल्या कसोटी सामना 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होता. मात्र तिसऱ्या दिवशीच या सामन्याचा निकाल लागला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली आणि 177 या धावसंख्येवर सर्वबाद झाली. त्यानंतर भारताने सर्वबाद 400 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 91 धावांवर सर्वबाद झाला. भारताचा एक डाव आणि 132 धावांनी विजय झाला. या सामन्यात केएल राहुलने 20 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या. त्या प्रत्युत्तर भारताने सर्वबाद 262 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने एका धावेच्या आघाडीसह 118 धावा केल्या आणि विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने चार गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलनं 17 धावा आणि दुसऱ्या डावात केवल 1 धाव करून बाद झाला.
तिसरा कसोटी सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यातील विजयावर भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं स्थान निश्चित होणार आहे. हा सामना जिंकल्यास भारतीय संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारणार आहे.