मुंबई : व्यंकटेश अय्यर(Venkatesh Iyer)नं अलीकडच्या काळात आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवलीय. त्यामुळे तो टीम इंडिया(Team India)तर्फे खेळण्यासाठी दावेदार मानला जातोय. आयपीएल 2021(IPL 2021)मध्ये कोलकाता नाइट रायडर्स(Kolkata Knight Riders)कडून खेळताना त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. मात्र तो केवळ टी-20चा खेळाडू नाही. 50 षटकांच्या क्रिकेटमध्येही त्यानं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलीय. विजय हजारे ट्रॉफी 2021(Vijay Hazare Trophy 2021)मध्ये मध्य प्रदेशकडून खेळताना व्यंकटेशनं 9 डिसेंबरला शतक केलं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं केरळविरुद्ध 112 धावा केल्या. त्यानं 84 चेंडूंचा सामना करत सात चौकार आणि चार षटकार लगावले. यावेळी मध्य प्रदेशनं नऊ गड्यांच्या मोबदल्यात 329 धावा केल्या.
विष्णू विनोद सर्वात यशस्वी
व्यंकटेश अय्यरशिवाय मध्य प्रदेशकडून शुभम शर्मानं 82, अभिषेक भंडारी आणि रजत पाटीदारनं 49-49 धावा केल्या. मात्र, शेवटच्या षटकात झटपट धावा काढण्याच्या नादात विकेट गमावल्या. मध्य प्रदेशची धावसंख्या एकवेळ 44.5 षटकांत 4 बाद 287 अशी होती. पण त्यानंतर पुढच्या 31 चेंडूत 42 धावा झाल्या आणि पाच विकेट पडल्या. यामुळे संघाला 350 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही. केरळकडून विष्णू विनोद हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं तीन बळी घेतले.
अय्यरचं तिसरं शतक
प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशनं एकही धाव न काढता सिद्धार्थ पाटीदारची विकेट गमावली होती. पण त्यानंतर भंडारी आणि रजत यांनी दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. दोघेही 108 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे मध्य प्रदेश पुन्हा अडचणीत आलं. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि शुभम शर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी 169 धावांची भागीदारी केली. शुभम 67 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकारासह 82 धावा करून बाद झाला. व्यंकटेश अय्यरनं दुसऱ्या टोकाला उभं राहून आपलं तिसरे शतक पूर्ण केलं. तो सहावा गडी म्हणून बाद झाला.
अय्यरची 198 धावांची खेळी
व्यंकटेशनं या शतकाच्या माध्यमातून टीम इंडियात स्थान मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केलाय. या वर्षाच्या सुरुवातीलाही त्यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये झंझावाती शतक झळकावलं होतं. त्यानंतर पंजाबविरुद्ध 146 चेंडूंत 20 चौकार आणि सात षटकारांसह 198 धावांची खेळी केली. आता तो मधल्या फळीत फलंदाजी करतोय. फिनिशर म्हणूनही तो प्रयत्न करतोय. तसंही हार्दिक पंड्या(Hardik Pandya)ही बाहेर असल्यानं टीम इंडिया एका फिनिशरच्या शोधात आहे.