मुंबई – यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पडली. भव्य-दिव्य पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. अंतिम फेरीत त्याने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवलं. महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणं ही साधीसुधी गोष्ट नाहीय. त्यासाठी प्रचंड परिश्रम, मेहनत लागते. शिवराज राक्षेने अथक मेहनतीने हे यश कमावलं. शिवराज राक्षेने अलीकडेच एका सन्मान कार्यक्रमात कुस्तीचा वारसा कोणाकडून लाभला? यामागे किती वर्षापासूनची त्याची मेहनत आहे? भविष्यातील त्याच्या योजना काय आहेत? या बद्दल माहिती दिली.
शिवराज राक्षेचे पहिले गुरु कोण?
“कुस्तीक्षेत्रात पैलवानीचा वारसा मला आजोबांपासून लाभलाय. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वडिलांनी, माझ्यामध्ये महाराष्ट्र केसरीच स्वप्न पाहिलं. त्यांनी अहोरात्र, कष्ट करुन रक्ताच पाणी करुन मला घडवलं. त्यामुळे आई-वडिल माझे पहिले गुरु आहेत” असं शिवराज राक्षेने सांगितलं.
तरुण पिढीला काय सल्ला दिला?
“आजच्या तरुण पिढीने खचून जाऊ नये. त्यांनी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. एकदिवस यश नक्की मिळेल. यश एकरात्रीत मिळत नाही. मी 14 वर्ष तपश्चर्या केली. सहजासहजी काहीही मिळत नाही. देवाला पण, प्रभु रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. पयत्न करा, खचून जाऊन नका, यश तुमचच असणार आहे” असं शिवराज राक्षे म्हणाले.
शिवराज राक्षेचा भविष्याचा प्लान काय?
“महराष्ट्र केसरी झाल्यापासून माझे अनेक सत्कार समारंभ झाले. कौतुकाचा वर्षाव झाला. जिल्ह्यात होणारा हा माझा पहिला सन्मान असला, तरी शेवटचा नक्कीच नाही. येणाऱ्या काळात ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी प्रयत्न चालू राहतील. शेवटपर्यंत तुमच प्रेम असंच राहू द्या” असं शिवराज राक्षेने सांगितलं.