मुंबई : नुकतीच एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा पार पडली. राज्याच्या सर्वच जिल्ह्यातील शाळा या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्य दाखवणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. 9 ते 14 वयोगटातील मुलांसाठी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेनंतर टीव्ही 9 मराठी प्रायोजित महाराष्ट्राचा महासंकल्प मिशन वर्ल्ड कप कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यांनी क्रीडा खात्याने फुटबॉलची निवड का केली? एफसी बायर्न क्लबमध्ये खेळाडूंना पाठवण्याचा काय फायदा होणार? त्या बद्दल माहिती दिली.
खेळाचा आणि माझा जवळचा संबंध
“मी मूळात खेळाडू आहे. पुणे विद्यापीठात कबड्डी खेळाडू होतो. महाराष्ट्र टीममध्ये खेळायचो. कुस्ती खेळलोय. व्हॉलीबॉल विद्यापाीठाचा कॅप्टन होतो. खेळाचा आणि माझा जवळचा संबंध आहे” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
म्हणून फुटबॉलची निवड केली?
“खेळाचा विचार केला तर, माझ्या मनात खंत होती, फुटबॉल जगातला लोकप्रिय खेळ आहे. पण आपल्या देशात किंवा राज्यात फुटबॉलला महत्व दिलं जात नाही. सर्वात जास्त व्यायाम या खेळात होतो. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी फुटबॉल खेळाचा फायदा होता. म्हणून आम्ही फुटबॉलची निवड केली” असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
फुटबॉलच का?
“एफसी बायर्न क्लबसोबत करार करण्याचा दुग्ध शर्करा योग जुळून आला. त्यातून देवाण-घेवाण होणार आहे. 1 लाखामधून 20 विद्यार्थी निवडले गेले, फुटबॉल कमी खर्चाचा खेळ आहे. एक बॉल आणला, मैदान असंल की तुम्ही खेळू शकता. त्या तुलनेत बॅडमिंटन, क्रिकेट महागडा खेळ आहे. फुटबॉलमध्ये 22-25 खेळाडू सहज खेळ शकतात. हा आर्थिक दृष्टया परवडणारा खेळ आहे” असं गिरीश महाजजन यांनी सांगितलं.
एफसी बायर्न क्लबची निवड का?
“एफसी बायर्न क्लबसोबत करार केलाय. त्यातून खेळाडूंना चांगलं तंत्रज्ञान अवगत होईल. चांगले खेळाडू तयार व्हावे, म्हणून बायर्न क्लबची निवड केली. आमचे विद्यार्थी, प्रशिक्षक तिथे जातील. वर्षभर देवाण-घेवाण होईल. खेळाडूंना फुटबॉलच चांगलं तंत्रज्ञान अवगत होईल” असं गिरीश महाजन म्हणाले.