आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं (MI) खराब प्रदर्शन अजूनही सुरू आहे. या सीझनमध्ये मुंबईने 3 सामने गमावले आहेत. 4 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या (LSG) सामन्यात त्यांना 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, एक वेळ अशी होती की मुंबई हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र अखेरच्या दोन षटकांत लखनौच्या गोलंदाजांच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे मुंबईच्या फलदांजांनी अक्षरश: घुडगे टेकले. कर्णधार हार्दिक पंड्याने खूप प्रयत्न केले पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या षटकात 22 धावा हव्या होत्या, त्या धावा करण्यात तो अपयशी ठरला. पंड्याने या सामन्यात चांगली फलंदाजी केली, पण शेवटच्या षटकात त्याने असे काही केले ज्यामुळे फ्रँचायझी मालक आकाश अंबानी प्रचंड संतापला. त्याची रिॲक्शन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
पंड्यावर का भडकला आकाश अंबानी ?
खरंतर काल मुंबई इंडियन्सला शेवटच्या 6 चेंडूत 22 धावांची गरज होती. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने आवेश खानकडे चेंडू सोपवला. या षटकात पांड्याने धोनीप्रमाणे आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ही कृती आकाश अंबानीला आवडली नाही. हार्दिकने पहिल्या 2 चेंडूत 8 धावा फटकावल्या. त्यामुळे 4 चेंडूत 14 धावा हव्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबईला सामना जिंकण्याची संधी होती. पण तिसऱ्या चेंडूवर पंड्या नीट खेळू शकला नाही आणि तो बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेला. नॉन स्ट्राइकवर उभा असलेला मिचेल सँटनर 1 धाव घेण्यासाठी धावला, मात्र तेव्हाच हार्दिकने धोनीसारखी कृती केली. त्याने दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या मिचेल सँटनरला , तो अर्ध्यात आलेला असतानाच परत पाठवलं, आणि हे पाहून आकाश अंबानीच्या संतापाचा कडेलोट झाला.
डॉट खेळणं पडलं महागात
तिसऱ्या चेंडूवर एकही धाव न घेतल्याने मुंबईला नुकसान सोसावे लागले. आवेश खानने चौथ्या चेंडूवर शानदार यॉर्कर टाकला, ज्यावर पांड्याला एकही धाव घेता आली नाही. अशाप्रकारे, सामन्यातील शेवटची उरलेली आशाही संपुष्टात आली, कारण मुंबईला विजयासाठी 2 चेंडूत 14 धावा करायच्या होत्या. तेव्हा पंड्याने 2 षटकार मारले असते तरी मुंबईला सामना 1 रनने गमवावा लागला असता. मात्र, पुढच्या 2 चेंडूंवर केवळ 1 धाव घेता आली. दुसरीकडे, पंड्याने तिसऱ्या चेंडूवर सँटनरला स्ट्राइक दिली असती, तर त्याला सामना जिंकण्याची किंवा टाय करण्याची संधी होती, जी त्याने गमावली. हार्दिकचा स्वत:वर असलेला आत्मविश्वास नडला, फारच महागात पडला. दोन डॉट बॉल खेळल्याने मुंबईच्या विजयाच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या.
तिलक वर्मा ठरला खरा व्हिलन
या सामन्यात हार्दिक पांड्याने चूक तर नक्कीच केली पण मुंबईच्या पराभवात तिलक वर्मा सर्वात मोठा खलनायक ठरला. त्याने प्रत्येक धावेसाठी संघर्ष केला, अतिशय संथ खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खराब फलंदाजीमुळे त्याला रिटायर आऊट होऊन परतावे लागले. 23 चेंडू खेळून तो अवघ्या 25 धावा करू शकला, त्यामुळे 204 धावांचा पाठलाग करताना मुंबईला अपयश आलं.