कराची : पाकिस्तान-न्यूझीलंडल वनडे सीरिज रद्द करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सीरिज रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे रावळपिंडी वन डे सुरु होण्याआधीच मॅच रद्द करण्यात आली आहे. पहिल्या सामन्याचा टॉस होण्याच्या अर्धा तास आधीच मॅच रद्द करण्यात आली. 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी मॅचेसची सिरीज रद्द झाली आहे. न्यूझीलंड संघ आता परत मायदेशी जाणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड टीम तब्बल 18 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. संपूर्ण संघ 12 सप्टेंबरला पाकिस्तानात पोहोचला होता. सर्व संघाला कडक पोलीस बंदोबस्तात इस्लामापूर विमानतळावरुन हॉटेलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. पीसीबीने न्यूझीलंड आणि त्यांच्या खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये बायो बबलची व्यवस्था केली होती.
पाकिस्तान क्रिकेटवर संकटाचे ढग पुन्हा दाटून आले आहेत. न्यूझीलंडचा पूर्ण पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येणार होते. वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार होती. त्यातील पहिला वनडे सामना आज (17 सप्टेंबर) खेळवण्यात येणार होता. मात्र, पहिल्याच सामन्याच्या टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधीच हा सामना रद्द करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काहितरी विपरीत होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी मैदानात खेळण्यास नकार दिला.
The BLACKCAPS are abandoning their tour of Pakistan following a New Zealand government security alert.
Arrangements are now being made for the team’s departure.
More information | https://t.co/Lkgg6mAsfu
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 17, 2021
न्यूझीलंडकडून स्टेडियममध्ये काहीतरी घातपात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना स्टेडियममध्ये न जाता हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचवेळी क्रिकेट चाहत्यांनादेखील स्टेडियममध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. संबंधित माहिती आल्यानंतर अवघ्या काही क्षणात संपूर्ण दौराच रद्द झाल्याची माहिती न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या कानावर पडली.
या सर्व घडामोडींवर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आम्हाला सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला. तसेच त्यांनी सीरिज रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. पीसीबी आणि पाकिस्तान सरकारने सामन्यासाठी सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त केला होता. पीसीबी निर्धारित सामना खेळवण्यास तयार आहे. पण त्यांनी दौराच रद्द करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या मिनिटाला अशाप्रकारे सीरिज रद्द झाल्याने पाकिस्तान आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत”, अशी भूमिका पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाईट यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. “आम्हाला सामन्याच्या सुरक्षेसंदर्भात जी सूचना मिळत होती त्या सूचनेच्यानुसार तो दौरा पूर्ण करणं शक्य नव्हतं. पीसीबीला हा झटका आहे, ते मी समजू शकतो. पण खेळाडूंची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. याशिवाय सीरिज रद्द करणं हाच त्यावरचा जबाबदार आणि योग्य पर्याय आहे”, असं डेव्हिड व्हाईट यांनी सांगितलं.
हेही वाचा :
विराट आणि बीसीसीआयमध्ये तणाव, माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांचा खुलासा