पुणे : News 9 प्लसने आयोजित केलेल्या कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेत रविवारी एचडीएफसी बँक टीम 1 ने बाजी मारली. एचडीएफसी बँक टीम 1 आणि इन्फोसिसमध्ये अंतिम सामना रंगला होता. निर्धारित वेळेत गोल शुन्य बरोबरी कायम राहिली. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये एचडीएफसी बँक टीम 1 ने 4-3 एका गोलच्या फरकाने विजेतेपद मिळवलं.
टीव्ही 9 नेटवर्कचा भाग असलेल्या News 9 प्लसने ही भव्य कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. टीव्ही 9 नेटवर्क हे भारतातील सर्वात मोठं टेलिव्हिजन न्यूज नेटवर्क आहे.
बिझनेस क्षेत्रातील लीडर्सना एक नवीन अनुभूती
News 9 प्लसने कॉर्पोरेट कपच्या निमित्ताने एक नवीन उपक्रम सुरु केलाय. बिझनेस क्षेत्रातील लीडर्सना एक नवीन अनुभूती दिली. या फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने कॉर्पोरेट विश्वाला एक नवीन उत्साह, जोश अनुभवता आला. तीन दिवस चाललेली ही स्पर्धा रविवारी संपली.
जर्मनीतील मोठ्या लीगचे सल्लागार कॉर्पोरेट कपबद्दल काय म्हणाले?
कॉर्पोरेट विश्वातील ही एक मोठी फुटबॉल टुर्नामेंट होती. या स्पर्धेने कॉर्पोरेट विश्वाला एक अविस्मरणीय असा अनुभव दिला. “इतक्या वर्षात, मी अशा स्तराची कॉर्पोरेट कप स्पर्धा जगभरात कुठेही पाहिली नव्हती. पीच, ब्रँडिंग, प्रयत्न, समर्पण आणि सर्वांची कटिबद्धता उत्कृष्ट होतं” असं बुंडेस्लिगाचा वरिष्ठ सल्लागार पीटर लीबल म्हणाले. बुंडेस्लिगा ही जर्मनीतील एक फुटबॉल लीग आहे.
टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी, साईओ बरुण दास काय म्हणाले?
कॉर्पोरेट कपच्या अंतिम सामन्याला टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि साईओ बरुण दास उपस्थित होते. “News9 Plus कॉर्पोरेट कप स्पर्धेने जे स्वप्न दाखवलं होतं, ते पूर्ण केलं याचा मला आनंद आहे. कॉर्पोरेट लीडर्सना या स्पर्धेने एक उत्तम अनुभव दिला. आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग आणि पाठिंबा यामुळे पहिल्यावर्षी ही स्पर्धा यशस्वी ठरली. पुढच्यावर्षी News9 Plus कॉर्पोरेट कप स्पर्धा अधिक उत्साहवर्धक असेल. आणखी मोठ्या स्तरावर या स्पर्धेच आयोजन करण्यात येईल” असं टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि साईओ बरुण दास म्हणाले.
पुढच्यावर्षी महिलांचा सुद्धा सहभाग?
पुढच्यावर्षी महिलांचा सुद्धा या स्पर्धेत सहभाग असेल, असं बरुण दास यांनी सांगितलं. “पुढच्यावर्षी महिला स्पर्धकांना कॉर्पोरेट कप स्पर्धा जिंकताना पाहून आनंद होईल” असं बरुण दास म्हणाले. वर्ल्ड कप, ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास दास यांनी व्यक्त केला. “फुटबॉल फक्त एक खेळ नाहीय. जगभरातील युवकांसाठी हा एक आयुष्याचा भाग आहे” असं बरुण दास म्हणाले. बरुण दास यांना स्वत:ला फुटबॉलची आवड आहे.
HDFC बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणाले…..
“या लेव्हलची फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी संपूर्ण टीव्ही 9 टीमचा आभारी आहे. सर्वांनीच खूप मेहनत घेतली. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेच व्यवस्थापन करण्यात आलं. मागच्या 25 वर्षातील आम्ही खेळलेली सर्वोत्तम व्यवस्थापन असलेली ही स्पर्धा आहे. भारताला अशा स्पर्धेची गरज होती. टीव्ही 9 ने पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे आभार. आमचा अशा उपक्रमांना नेहमी पाठिंबा असतो” असं HDFC बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुकेश शास्त्री म्हणाले. कंपनीच्या स्पोर्ट्स विभागाचे सुद्धा ते प्रमुख आहेत.
इंडिया लिजेंडचे कॅप्टन अलवितो कुन्हा न्यूज 9 प्लस कॉर्पोरेट कपबद्दल म्हणाले की, “ही स्पर्धा आय़ोजित केल्याबद्दल मी बरुण दास आणि पीटर यांचे आभार मानतो. इथलं वातावरण खूप चांगलं आहे. आम्ही खरोखर आनंद घेतला. भविष्यातही आम्हाला अशा स्पर्धेचा भाग होणं आवडेल”