नवी दिल्ली: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची (PV sindhu) दमदार कामगिरी सुरु आहे. गुरुवारी स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगवर (pornpawee Chochuwong) शानदार विजय मिळवला. स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूने चोचुवँगवर २१-१४, २१-१८ अशी सरळ सेटमध्ये मात केली.
सिंधूने संपूर्ण कोर्टवर वर्चस्व गाजवताना प्रतिस्पर्धी चोचुवँगवर ४८ मिनिटात विजय मिळवला. या विजयासह सिंधूने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने या विजयासह पराभवाची मालिका खंडीत केली. या आधी झालेल्या दोन सामन्यात चोचुवँगने तिला पराभूत केले होते. ऑल इंग्लंड ओपन आणि वर्ल्ड टूर फायनलमध्ये सिंधूला पोर्नपावी चोचुवँगकडून पराभव पत्करावा लागला होता.
आजच्या सामन्यात सिंधूने चोचुवँगला कुठेही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आपल्या खेळाने पूर्णपणे तिला निष्प्रभावी करुन टाकले. उद्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना वर्ल्ड नंबर १ ताई यिंग बरोबर होणार आहे. तैवानच्या ताई यिंग विरुद्धचा सिंधूचा रेकॉर्ड फार चांगला नाहीय. ताईने गुरुवारी झालेल्या सामन्यात पिछाडीवरुन भरारी घेत विजय मिळवला. तिने स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमोरचा २१-१०, १९-२१, २१-११ असा पराभव केला.
संबंधित बातम्या:
‘विराट आधी देशाचा विचार करं’, बोर्डाशी पंगा घेणाऱ्या कॅप्टनला मोठ्या क्रिकेटपटूचा मोलाचा सल्ला
Ashes 2021: हवेत झेपावून बटलरची सुपरमॅन कॅच, हा VIDEO नक्की पाहा
IND VS SA: विराटने बसमधून उतरुन सांगितलं, फोटो नका काढू, विमानतळावर नेमकं काय घडलं?