कोटा : प्रसिद्ध बॉडीबिल्डर प्रेमराज अरोडा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काल बुधवारी कोटा येथील रुग्णालयात प्रेम अरोडा यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अवघे 42 वर्षाचे होते. त्यांच्यामागे आईवडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात त्यांचं निधन झालं. सायलंट हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी बॉडीबिल्डर स्पर्धेत त्यांना मिस्टर इंडियाचा पुरस्कार मिळाला होता. ते देशातील प्रसिद्ध बॉडीबिल्डरांपैकी एक होते.
प्रेमराज अरोडा हे आरोडा समाजाचा अध्यक्ष होते. कोटामध्ये ते जीम चालवत होते. तरुणांसाठी ते बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धाही आयोजित करायचे. राजस्थानच्या कोटा येथील कैथूनीपोल येथे राहणाऱ्या प्रेमराज यांनी अनेक पुरस्कार जिंकले होते. त्यातील मिस्टर इंडिया हा सर्वोच्च पुरस्कारही त्यांनी पटकावला होता.
प्रेमराज यांनी 1993मध्ये जिमिंगला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात ते सिटी लेव्हल आणि स्टेट लेव्हलच्या स्पर्धेत भाग घ्यायचे. त्यांनी विविध पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे केवळ त्यांच्या पुरस्कारांनी अख्खं घर भरून गेलं आहे. ते अनेक वेळा मिस्टर कोटा आणि मिस्टर हाडोतीही राहिलेले आहेत. पॉवर लिफ्टिंगमध्ये स्पर्धेत उतरल्यानंतर त्यांनी 2016 पासून ते 2018पर्यंत मिस्टर राजस्थानचा पुरस्कार पटकावला. ते गोल्ड मेडिलिस्टही होते. पॉवर लिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंगमध्ये त्यांनी संपूर्ण देशात लौकीक मिळवला होता, असं प्रेमराज यांचे लहान भाऊ राहुल यांनी सांगितलं.
राहुल यांच्या माहितीनुसार, प्रेमराज यांना कोणताच मोठा आजार नव्हता. मात्र, त्यांना कधी कधी अॅसिडीटीची समस्या जाणवायची. रविवारी सकाळी त्यांना अॅसिडीटीचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांनी औषधे घेतली होती. त्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच अवघ्या 20 मिनिटात त्यांचं निधन झालं.
प्रेमराज केवळ बॉडीबिल्डिंगच करत नव्हते तर तरुणांना चांगलं मार्गदर्शनही करायचे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावं असं ते सतत सांगायचे. लोकांनाही सांगायचे आणि स्वत:ही ते फिट राहायचे. तरुणांनाही फिट राहण्यासाठी थोडा वेळ काढण्याचं आवाहन करायचे. ते बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धा भरवायचे. तरुणांना बक्षीसं द्यायचे. नुकतीच त्यांनी नवी जीमही सुरू केली होती.