Pele dies : चहाच्या दुकानावर काम करणारं प्वॉर कसं बनलं महान फुटबॉलपटू?; पेले यांची कहाणी… असा फुटबॉलपटू होणे नाही!

| Updated on: Dec 30, 2022 | 10:00 AM

पेले यांचा फुटबॉलचा प्रवास इंडोअर फुटबॉलपासून सुरू झाला. ते एका संघात सामील झाले. त्यानंतर त्यांच्या परिसरात इंडोअर फुटबॉल अत्यंत लोकप्रिय झाला.

Pele dies : चहाच्या दुकानावर काम करणारं प्वॉर कसं बनलं महान फुटबॉलपटू?; पेले यांची कहाणी... असा फुटबॉलपटू होणे नाही!
चहाच्या दुकानावर काम करणारं प्वॉर कसं बनलं महान फुटबॉलपटू?; पेले यांची कहानी...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ब्राजीलिया : शतकातील महान फुटबॉलपटू पेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. तीनवेळा वर्ल्डकप जिंकणारे ते जगातील एकमेव फुटबॉलपटू होते. 1940 जन्मलेल्या पेले यांनी वयाच्या 15व्या वर्षी सांतोस क्लब आणि नंतर 16 व्या वर्षी ब्राझिलच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण केलं. त्यानंतर पेले यांचा इतिहास सुरू झाला. त्यांनी जगाला फुटबॉलचे धडे दिले. पेले यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण 1279 गोल केले. असा विक्रम करणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते. 1999मध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने त्यांची शतकातील सर्वात महान खेळाडू म्हणून निवड केली होती.

पेले सारखे खेळाडू शतकातून एकदाच होतात. एवढा मोठा पल्ला गाठणं त्यांना सहज शक्य नव्हतं. चहाच्या दुकानात चहा विकण्याचं काम करत असताना एक दिवस आपण या शतकातील महान फुटबॉलपटू बनू असं त्यांना कधीच वाटलं नसेल. जेव्हा आपण जगाचा निरोप घेऊ तेव्हा संपूर्ण जगाला रडवून जाऊ असंही त्यांना कधी वाटलं नसेल. पण पेले यांनी फुटबॉल जगतात नवनवे विक्रम प्रस्थापित करत इतिहास घडवला. अन् इतिहासातील दंतकथा बनून राहिले आहेत.

हे सुद्धा वाचा

पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940मध्ये ब्राझिलमध्ये झाला. घर खर्च चालवण्यासाठी पेले चहाच्या दुकानात काम करत होते. त्यांना लहानपणापासून फुटबॉल खेळण्याची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांनी फुटबॉल खेळायला शिकवलं होतं. पण पेले यांचे वडील फुटबॉलचा खर्च उचलू शकत नव्हते.

त्यामुळे पेले सॉक्समध्ये पेपर भरून त्याचा फुटबॉल बनवायचे अन् फुटबॉल खेळायचे. सुरुवातीच्या काळात ते अनेक इमॅच्युअर टीममधून खेळले. त्यांनी 2 यूथ स्टेट चॅम्पिअनशीपमध्ये बौरू अॅथलेटिक क्लब ज्युनिअर्सचे कर्णधारपद भूषवले होते.

पेले यांचा फुटबॉलचा प्रवास इंडोअर फुटबॉलपासून सुरू झाला. ते एका संघात सामील झाले. त्यानंतर त्यांच्या परिसरात इंडोअर फुटबॉल अत्यंत लोकप्रिय झाला. त्यांनी आपल्या भागातील फुटबॉलची स्पर्धाही जिंकली होती. पेले आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदाच चॅम्पियनशीप जिंकली होती. तेव्हापासून पेले यांचा महान फुटबॉलपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला.

वयाच्या 14व्या वर्षापर्यंत पेले फुतसल खेळत होते. त्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी सांतोस क्लबमधून फुटबॉलच्या दुनियेत प्रवेश केला. त्यानंतर एक वर्षातच पेले यांचा ब्राझिलच्या संघात प्रवेश झाला. त्यानंतर वर्षभरातच वर्ल्ड कप जिंकणारे पेले हे जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरले. त्यानंतर पेले यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या करिअरचा ग्राफ चढताच राहिला.