कोबेनहवन : युरोपियन देशात सुरु असलेली युरो चषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून सध्या बाद फेरीचे सामने सुरु आहेत. रविवारी रोनाल्डो कर्णधार असलेला पोर्तुगालचा संघ स्पर्धेबाहेर गेल्यानंतर सोमवारचा स्पेन आणि क्रोएशिया या तुल्यबळ संघातील सामनाही चांगलाच चुरशीचा झाला. एकामागोमाग एक गोल होत असताना अधिकच्या वेळेत स्पेनने दोन अधिक गोल करत सामना आपल्या नावे केला. या विजयासह स्पेनचा संघ क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे सामन्यात स्पेनने 5 गोल केल्याने युरो चषकाच्या सलग दुसऱ्या सामन्यात 5 गोल करण्याचा विक्रमही त्यांनी आपल्या नावे केला आहे. (In round 16 match of Euro 2020 Spain defeated Croatia by 5-3 And enters in Quarter Final)
स्पेनने क्रोएशियाला 5-3 च्या फरकाने पराभूत केले असले तरी हे करणे स्पेनसाठी तितके सोपे नव्हते. सामन्याच्या पहिल्या 45 मिनिटांत म्हणजेच हाल्फ टाईमपर्यंत स्कोर 1-1 होता. दोघांकडून चुरशीची टक्कर देण्यात येत होती. मात्र पहिल्या हाल्फमध्ये दोघांनीही समान गोल केले असल्याने पुढील 45 मिनिटांत सामन्याचा निर्णय होणार होता.
पहिला हाल्फ 1-1 च्या बरोबरीत सुटल्यानंतर स्पेनने गिअर अप करत क्रोएशियावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 57 व्या मिनिटालाच दुसरा गोल करत स्पेनने सामन्यात 2-1 ची आघाडी घेतली. क्रोएशियाकडूनही गोल करण्याचा प्रयत्न सुरुच होता. तेवढ्यातच स्पेनने पुन्हा एक संधी साधत 75 व्या मिनिटाला आणखी एक गोला केला आणि 3-1 ची आघाडी घेतली. स्पेनने 2 अधिक गोलची आघाडी घेतल्याने सामना स्पेनच्या पारड्यात झुकताना दिसत असतानाच क्रोएशियाने पलटवार केला.
स्पेनने 3-1 ची आघाडी घेतल्यानंतर क्रोएशियाने पलटवार करत 85 व्या मिनटाला गोल केला. लगेचच 90 व्या मिनटाला आणखी एक गोल करत क्रोएशियाने सामन्यात बरोबरी साधली. दोन्ही संघ समान स्कोरवर असल्याने सामना खेळवण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली. अतिरिक्त वेळेमध्ये दोन्ही संघ एकमेंकाच्या गोलपोस्टवर हल्ला करु लागले.
एक्सट्रा टाइममध्ये स्पेनचा स्टार स्ट्राईकर मोराटाने 100 व्या मिनिटाला आणि ओएराझीबेलने 103 व्या मिनटाला गोल करत स्पेनला 5-3 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर क्रोएशियाला एकही पलटवार करता आला नाही. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात अखेर स्पेनचा विजय झाला. स्पेन या विजयासह क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तिकडे फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत स्वित्झर्लंडने ही क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे 2 जुलैला हे दोन्ही संघ क्वॉर्टर फायनलचा सामना खेळतील.
हे ही वाचा :
Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर
Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत
(In round 16 match of Euro 2020 Spain defeated Croatia by 5-3 And enters in Quarter Final)