नवी दिल्ली: भारताचे महान हॉकीपटू (Hocky player) आणि 1964 मधील टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे कर्णधार चरणजीत सिंग (Charanjit Singh) यांचे आज निधन झाले. वाढत्या वयोमानानुळे निर्माण झालेल्या शारीरिक व्याधींमुळे त्यांचे हिमाचल प्रदेश उना येथे निधन झाले. माजी मिडफिल्डर असणारे चरणजीत सिंग 90 वर्षांचे होते. पुढच्या महिन्यात ते वयाच्या 91 व्या वर्षात पदार्पण करणार होते. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. पाच वर्षांपूर्वी चरणजीत यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारीच होते.
22 नोव्हेंबर 1930 रोजी उना जिल्ह्यातील माईरी गावात चरणजीत यांचा जन्म झाला. डेरा डूनच्या कर्नल ब्राऊन केमब्रिज स्कूलमधून त्यांचे शिक्षण झाले. 1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या हॉकी संघाचा ते भाग होते. पंजाब युनव्हर्सिटीमधून त्यांचे शिक्षण झाले. “पाच वर्षांपूर्वी बाबांना पक्षघाताचा झटका आला होता. ते काठीचा आधार घेऊन चालायचे. पण मागच्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली” असे त्यांचा मुलगा व्ही.पी.सिंह यांनी सांगितले.
On behalf of Hockey India, we mourn the loss of a great figure of Indian Hockey, Shri Charanjit Singh.
May his soul Rest in Peace? pic.twitter.com/PTb38lHDS6
— Hockey India (@TheHockeyIndia) January 27, 2022
माझी बहिण दिल्लीला राहते. ती उना येथे आल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील असे मुलाने सांगितले. चरणजीत सिंग यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर असून तो कॅनडाला आहे. चरणजीत यांनी अखेरचा श्वास घेतला, तेव्हा दुसरा मुलगा त्यांच्यासोबत होता. चरणजीत यांची मुलगी विवाहित असून ती दिल्लीला राहते. हॉकीमधून निवृत्त झाल्यानंतर चरणजीत सिंग यांनी सिमल्यातील हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटीच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून काम केलं.