मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) यांच्या स्मरणार्थ एनजीओ जन ऊर्जा मंचने आयोजित केलेल्या ‘उद्घोष’ कार्यक्रमात जागतिक किर्तीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P.V.Sindhu), आर्चरी गर्ल (तिरंदाज) डॉली शिवानी, एनआयएमएसचे न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध पुरोहित यांना ‘नेताजी’ पुरस्काराने (Netaji Awards) सन्मानित करण्यात आले. हैदराबादमधील बिर्ला तारांगण येथे आज सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली.
इन्स्टिट्यूट ऑफ एन्शियंट इंडियन फिलॉसॉफीचे संस्थापक आणि जागतिक ख्यातीचे गणितज्ञ श्रीनिवास रामानुज यांचे नातू प्रा. राजम यांना हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि त्रिदंडी चिन्ना जेयार स्वामी यांच्या हस्ते ‘नेताजी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पी. व्ही. सिंधू हिला दिला जाणारा युवा रत्न पुरस्कार तिचे वडील रमणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयुष रत्न पुरस्कार आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.सुरेश जकोटिया यांना दिला गेला. दिवंगत हरिप्रसाद भद्रूका यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र श्रीकृष्ण भद्रुका यांनी स्वीकारला.
डॉली शिवानी या तिरंदाज असलेल्या 9 वर्षीय खेळाडूला बालरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ती 3 वर्षांची असताना तिला तिच्या वडिलांनी तिरंदाजीचे प्रशिक्षण दिले होते. श्याम गोपाल दास यांना गिलोई आणि तुळशीच्या औषधी वनस्पतींचे मोफत वाटप केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तिरंदाजी दांपत्य सत्यनारायण चेरुकुरी आणि कृष्णा कुमारी यांना संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. Cerebral Palsy (सेरेब्रल पाल्सी) वर काम करणाऱ्या एनआयएमएस हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध पुरोहित यांचादेखील गौरव करण्यात आला.
116 लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखल्याबद्दल टांक बुंद हनुमंतू म्हणून ओळखल्या जाणार्या वड्डे हनुमंतू यांना समाज सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतःच्या 250 एकर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या तेलंगणाच्या जी. व्ही. के. राव यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना बंडारू दत्तात्रेय म्हणाले की, “आझादी का अमृत महोत्सव हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या महान कार्यांचे स्मरण करण्यासाठी सरकारचा एक उत्तम उपक्रम आहे. यामुळे प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना रुजते, जी काळाची गरज आहे.”
“नेताजींनी 13,000 सैनिकांची फौज तयार केली आणि परदेशातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, परंतु दुर्दैवाने नंतर त्यांना दहशतवादी संबोधण्यात आले,” त्रिदंडी चिन्ना जेयार स्वामी यांनी याबाबत दुःख व्यक्त केले. नेताजींच्या रेडिओ भाषणाचा हवाला देत ते म्हणाले, ‘तुम्हाला गुलाबाच्या सुगंधाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या काट्यांमुळे मिळणाऱ्या दुःखासाठी सज्ज व्हा’, संत रामानुजम यांनी एक हजार वर्षांपूर्वी जातीपातींच्या भेदभावाने ग्रासलेल्या समाजात समानता आणली’ असे स्वामीजी म्हणाले.
रामानुज सहस्राब्दी सोहळ्याबद्दल सविस्तर सांगताना चिन्ना जेयर स्वामी म्हणाले की, 2 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हैदराबादमधील मुचिंतल येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामानुजांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करतील आणि 4 फेब्रुवारी रोजी राष्ट्राला संबोधित करतील.
दरम्यान, तेलंगणाचे सांस्कृतिक आणि युवा व्यवहार मंत्री व्ही. श्रीनिवास गौड म्हणाले की, नेताजींना आदरांजली म्हणून प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे. त्यांनी यावेळी सर्वांना रक्तदानाचे आवाहन केले.
इतर बातम्याः
Latur Crime | मुलीसोबत आईची गळफास लावून आत्महत्या, लातूर हादरलं; नेमकं कारण काय ?