धक्कादायक खुलासा ! रक्त काढलं… नखं कापली, केस कापले… क्वालिफाय होण्यासाठी विनेशने काय नाही केलं?

| Updated on: Aug 07, 2024 | 2:08 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. ज्यादा वजन भरल्याने नियमानुसार विनेशला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. अंतिम फेरीत पोहोचूनही विनेश बाद ठरल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. यामुळे तिचं सुवर्ण पदकही गेलं आहे.

धक्कादायक खुलासा ! रक्त काढलं... नखं कापली, केस कापले... क्वालिफाय होण्यासाठी विनेशने काय नाही केलं?
Vinesh Phogat
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमधून आऊट झाली आहे. अंतिम फेरीत गेल्यानतंर तिचं वजन अधिक वाढल्याचं आढळून आल्याने तिला अंतिम फेरीत अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे विनेश सुवर्ण पदकाला मुकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगाट हिचं मंगळवारी रात्री 2 किलो वजन अधिक होतं. हे वजन कमी करण्यासाठी तिने रात्रभर मेहनत घेतली होती. तिने वजन कमी करण्यासाठी जे जे करता येईल ते ते केलं होतं. एवढंच नव्हे तर तिने वजन कमी करण्यासाठी तिचं रक्तही काढलं होतं.

सेमीफायनल खेळताना विनेश फोगाटचं वजन जवळपास 52 किलो होतं. दोन किलो वजन कमी करण्यासाठी तिने तिचं रक्तही काढलं होतं. विनेशने सेमीफायनल नंतर आराम केला नाही. ती रात्रभर जागली. आपलं अतिरिक्त वजन कमी करण्याचा तिने प्रचंड प्रयत्न केला. एक मिनिटही तिने वाया घालवला नाही. तिने वजन कमी करण्यासाठी रात्रभर सायकल चालवली. स्किपिंग केली. तिने केसही कापले आणि नखही कापले. विनेश एवढ्यावरच थांबली नाही, तिने आपल्या शरीरातून रक्तही काढलं. त्यानंतर तिचं वजन 50 किलो 150 ग्रॅम एवढं होतं.

वजनाचा नियम काय?

कुस्तीमध्ये कुस्तीपटूंना 100 ग्रॅम ज्यादा वजनाची सुट दिली जाते. म्हणजे विनेशचं वजन 50 किलो 100 ग्रॅम असतं तर ती अंतिम फेरीत खेळू शकली असती. पण तिचं वजन 50 ग्रॅम अधिक निघालं. त्यामुळे तिचं ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं. कुस्तीत कुस्तीपटूंचं वजन कुस्तीच्या सामन्याशी पडताळून पाहिलं जातं. त्याशिवाय कुस्तीपटूंना दोन दिवस त्यांचं वजन त्याच कॅटेगिरीत कायम ठेवावं लागतं. पण विनेशने असं केलं नाही. रिपोर्टनुसार, तिचं वजन 52 किलोपर्यंत गेलं होतं. ते कमी करण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. पण अखेर थोडं वजन अधिक भरल्याने तिला अंतिम सामन्यातून बाद व्हावं लागलं.

यापूर्वीही असंच घडलं होतं

2016च्या ऑलिम्पिकच्या आशियाई क्वालीफायरमध्येही असंच झालं होतं. 48 किलोग्रॅम वजनी गटात विनेश शेवटच्या क्षणीही वजन कमी करू शकली नव्हती. तिला घाम यायचं बंद झालं होतं. त्यामुळे आपलं वजन कमी होणार नाही हे तिला कळून चुकलं होतं. आताही सेमी फायनलमध्ये आल्यापासूनच तिने वजनावर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. लो कॅलरीजच्या पदार्थांचं सेवन करणं, तास न् तास सौना बाथ घेणं, सायकलिंग वगैरे करण्याचा तिने प्रयत्न केला होता. पण त्यात यश आलं नाही. एवढेच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी तिने पाणी घेणंही बंद केलं होतं. शरीरात पाणी राहू नये म्हणून तिने पाणी पिणं बंद केलं होतं.