मुंबई: आजपासून बंगळुरुमध्ये प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेचा दम घुमणार आहे. देश-विदेशातील कबड्डीप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे. मागच्यावर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. खरंतर कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल खेळ. प्रो कबड्डी लीगमुळे या खेळाला आता ग्लॅमर प्राप्त झालं आहे. अनेक नामवंत, प्रतिभावन कबड्डीपटू महाराष्ट्राने देशाला दिले आहेत. यंदाच्या प्रो कबड्डी लीगमध्ये महाराष्ट्राचे 23 सुपूत्र आपली प्रतिभा दाखवणार आहेत.
स्थानिक स्तरावरुन प्रो कबड्डी लीग पर्यंतचा टप्पा गाठवणाऱ्या महाराष्ट्रातील 23 कबड्डीपटूंचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
72 लाख रुपये मोजून त्याला संघाने कायम ठेवले
आज होणाऱ्या लढतीत यूपी योद्धा आणि बंगाल वॉरियर्समधील सामन्याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष असेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा असतील, त्या श्रीकांत जाधववर. महाराष्ट्राचा हा शिलेदार यूपी योद्धाचे प्रतिनिधीत्व करतो. यूपी योद्धाचा हा भरवाशाचा खेळाडू असून 72 लाख रुपये मोजून त्याला संघाने कायम ठेवले. आक्रमक चढाईपटू अशी त्याची ओळख आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील दहिगावणे या छोट्याशा गावातून आला
श्रीकांत जाधव अहमदनगर जिल्ह्यातील दहिगावणे या छोट्याशा गावातून आला आहे. आज श्रीकांतने मेहनतीच्या बळावर हा टप्पा गाठला आहे. कष्ट, मेहनत, संघर्ष प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन श्रीकांत इथपर्यंत पोहोचला आहे. कुटुंबीयांचा विरोध, बेताची परिस्थिती, टोमणे या सर्वांवर मात करुन श्रीकांतने स्वत:ची ओळख बनवली आहे. ज्यांनी ऐकवेळ त्याला ऐकवलं, तेच आज त्याचे स्तुतीपाठक बनले आहे. मेहनत, चिकाटी यामुळेच हे शक्य झालं आहे. श्रीकांतने शिकून, चांगली नोकरी करावी अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण त्याला कबड्डीचं वेड होतं. त्यामुळे त्याला सहाजिकच कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
जयपूर पिंक पँथर्स संघाने संधी दिली होती, पण…
प्रो कबड्डी लीगमध्ये श्रीकांतला सर्वप्रथम जयपूर पिंक पँथर्स संघाने संधी दिली होती. पण दुखापतीमुळे त्याला हंगामावर पाणी सोडावं लागलं. खांद्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी पैसे नव्हते. पण मित्रांची साथ आणि कर्ज काढून त्याने शस्त्रक्रिया करुन घेतली. मित्रांमुळेच आज मी कबड्डी खेळताना दिसतोय, असे श्रीकांत सांगतो. आज कबड्डीच्या बळावर श्रीकांतने कर्जाची परतफेड करुन कुटुंबाचा डोलारा संभाळतोय. यंदाच्या हंगामात त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या:
घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्याच्या मुलाचं IPL मध्ये फळफळेल नशीब; 2022च्या लिलावात लागू शकते मोठी बोली
India vs South Africa: कोणाला बसवायचं, कोणाला खेळवायचं? कोहली-द्रविड जोडी समोर मोठा पेच
आरोग्य भरतीमध्ये गट क साठी 15 लाख ते 30 लाखांची डील, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रेटकार्ड, मोडस ऑपरेंडी मांडली