मुंबई: कबड्डी हा अस्सल मातीतला खेळं. पण आता मॅटवर खेळली जाणारी कबड्डी ग्लोबल झालीय. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) सारख्या स्पर्धेमुळे कबड्डीला ग्लॅमर प्राप्त झालं आहे. दहावर्षांपूर्वी कबड्डीबद्दल असा विचारही कोणाच्या मनात आला नसता. आज आयपीएल, प्रो कबड्डी लीग सारख्या स्पर्धांमुळे या खेळांची आर्थिक भरभराट झाली आहेच, पण त्याचवेळी छोटीं शहरं, गाव-खेड्यात राहणाऱ्या खेळाडूंना एक ओळख मिळाली आहे. आर्थिक समृद्धी त्यांच्या पायाशी लोळणं घेत आहे. प्रो कबड्डीमधून नावारुपाला आलेला महाराष्ट्रातला असाच एक खेळाडू म्हणजे सिद्धार्थ देसाई. (Siddharth desai)
कोट्यवधी रुपयांना घेतलं विकतं
सिध्दार्थ देसाई मूळचा कोल्हापूरच्या चंदगडचा. आज तेलगु टायटन्सकडून खेळणाऱ्या सिद्धार्थचा प्रो कबड्डी लीगमधील प्रवास 2018 साली यू मुंबामधून सुरु झाला. पहिल्याच मोसमात यू मुंबाकडून खेळताना धडाकेबाज कामगिरी केल्यामुळे त्याला पुढच्या म्हणजे 2019 च्या मोसमात तेलगु टायटन्सने कोट्यवधीची बोली लावून खरेदी केले. 2019 च्या लिलावात त्यासा तेलगु टायटन्सने 1.45 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्याला रिटेन करताना तेलगु टायटन्सने यंदा 1.30 कोटी रुपये मोजले आहेत. सिद्धार्थला संघात ठेवण्यासाठी तेलगु टायटन्सने एफबीएम कार्डचा वापर केला.
कशी आहे कौटुंबीक पार्श्वभूमी
सिद्धार्थ देसाई एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. वडिल शेतकरी आहेत, तर आई गृहिणी. एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला ज्या अडचणीतून, समस्यांमधून जावे लागते, सिद्धार्थने सुद्धा ते सर्व अनुभवलं आहे. सिद्धार्थला लहानपणापासूनच कबड्डी खेळाची आवड होती. गावात त्याने सुरुवातीला कबड्डीचे धडे गिरवले. सिद्धार्थ देसाईचा मार्ग सोपा नव्हता, पण त्याने मेहनतीच्या बळावर हे साध्य करुन दाखवलं आहे. सिद्धार्थ शिक्षणातही मागे नाहीय. त्याने ‘फिजिक्स बीएससी’मध्ये पदवी घेतली आहे. पुण्याच्या सत्तेज बाणेर क्लबमधून त्याच्या व्यावसायिक कबड्डीला सुरुवात झाली. व्यावसायिक कबड्डी खेळताना त्याला एअर इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिथे अनुभवी खेळाडूंबरोबर खेळताना त्याचा खेळ अधिक बहरला.
कशी आहे सिद्धार्थची कामगिरी
प्रो कबड्डी लीग –
एकूण सामने – 43
एकूण पॉईंट – 441
सहावा सीझन – यू मुंबा
एकूण गुण – 221
सातवा सीझन – तेलगु टायटन्स
एकूण गुण – 220