मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवाजी पार्क जिमखान्यात टेनिस कोर्टवर उतरले. तब्बल वर्षभरानंतर राज ठाकरे यांनी टेनिस कोर्टवर उतरून टेनिस खेळण्याचा आनंद लुटला. राज ठाकरे हे टेनिसचे निस्सीम चाहते आहेत. वरचेवर ते जिमखान्यात येऊन टेनिसचा सराव करत असतात. टेनिस खेळण्याचा आनंद लुटत असतात. मात्र, गेल्यावर्षी दुखापत झाल्यानंतर ते टेनिसपासून काही काळ दूर राहावं लागलं होतं. पण आज त्यांनी टेनिस कोर्टवर उतरत कसून सराव करत टेनिस खेळण्याचा प्रचंड आनंद लूटला.
आज सकाळी शिवाजी पार्कवर स्वातंत्र्याची दौड आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये अनेक तरुणांनी भाग घेतला होता. या दौडसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यानंतर राज ठाकरे हे शिवाजी पार्क जिमखान्यात गेले. तिथे त्यांनी टेनिस कोर्टवर कसून सराव करत टेनिस खेळण्याचा आनंद लुटला. राज ठाकरे टेनिस खेळताना अत्यंत उत्साहात दिसत होते. त्यांच्या खेळात पूर्वी सारखीच लय होती. आपण फिट आहोत. तंदुरुस्त आहोत, हेच राज ठाकरे यांनी आपल्या टेनिस सरावातून आज दाखवून दिलं. राज ठाकरे टेनिस खेळतानाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत राज ठाकरे अत्यंत रुबाबदार दिसत आहेत.
गेल्या वर्षी टेनिस खेळत असताना राज ठाकरे हातावर पडले होते. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर छोटी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या खुब्यावरही शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांच्या चालण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यासाठी ते फिजिओथेरपी घेत होते. मध्यंतरी त्यांना कोरोनाही झाला होता. त्यामुळे राज ठाकरे हे टेनिसपासून वर्षभर वंचित होते. मात्र, आज त्यांनी टेनिस कोर्टवर उतरून कसून सराव केला. त्यांच्या खेळातून ते टेनिसपासून वर्षभर दूर होते असं अजिबात वाटत नव्हतं. इतक्या लिलया ते टेनिसचा आनंद लुटत होते.
ठाकरे कुटुंब जसं कलाप्रेमी आहे, तसं ते क्रीडाप्रेमी आहे. राज ठाकरे यांना टेनिस खेळणं आवडतं. क्रिकेटही त्यांचा आवडता खेळ आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडूंशी त्यांचा चांगला दोस्तानाही आहे. तर, राज ठाकरे यांच्या प्रमाणेच त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही टेनिस उत्तम खेळतात. शर्मिला ठाकरे देखील शिवाजी पार्क जिमखान्यात येऊन टेनिस खेळण्याचा आनंद लुटत असतात.
तर राज यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे सुद्धा टेनिसचे चाहते आहेत. टेनिससोबतच ते फुटबॉलही उत्तम खेळतात. राजकारणात फटकेबाजी करणारं ठाकरे कुटुंब टेनिस कोर्टवरही फटकेबाजी करताना पाहणं हा वेगळाच अनुभव असतो.