नैरोबी : भारताची महिला लांब उडी खेळाडू शैली सिंहने (Shaili Singh) रविवारी अंडर – 20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (U-20 World Athletics Championship) अंतिम फेरीत घेतलेल्या उडीने भारताला थेट रौप्य पदक मिळवून दिले. तब्बल 6.59 मीटर दूर उडी टाकत शैलीने ही कामगिरी केली. भारताला रौप्य पदक मिळवून देत 17 वर्षीय शैलीने इतिहास रचला. मूळची झाशी येथील असणाऱ्या शैलीने या विजयासोबत सर्व भारतीयांना आनंदी केलं आहे. विशेष म्हणजे दिग्गज खेळाडू अंजू बॉबी जॉर्जचं स्वप्नही शैलीने पूर्ण केलं असून ती मागील बऱ्याच काळापासून तिच्या अकादमीत प्रशिक्षण घेत होती. ही रुपेरी कामगिरी करणारी शैली मूळात एका गरीब कुटुंबातून आली आहे.
शैलीला वडिल नसल्याने केवळ आईने तिचा सांभाळ शिवणकाम करुन केला आहे. शैलीच्या आईने तीन भावडांचा सांभाळ करताना खूप कष्ट घेतले आहेत. शैलीने देखील आहे त्या परिस्थितीत मेहनत घेत अगदी विनाचप्पल शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. शूज घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने शैली विनाचप्पल स्पर्धांमध्ये भाग घेत असली तरी मेहनत आणि खेळाच्या जोरावर तिने कायमच उत्तम कामगिरी केली आहे.
शैली चार वर्षांपूर्वी विजयवाडा येथे झालेल्या जूनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर राहिली. यावेळी तिने पदक जिंकलं नाही, मात्र उत्कृष्ट खेळामुळे रॉबर्ट जॉर्ज यांच मनं जिंकलं. ज्यामुळे त्यांनी त्यांची पत्नी आणि दिग्गज खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज यांच्या अकादमीत शैलीची ट्रेनिंग सुरु केली. बंगळुरू य़ेथे शैली सराव करु लागली. रॉबर्ट जॉर्ज आणि अंजू यांनी शैलीला ट्रेन करण्यास सुरुवात करताच तिच्या खेळात आणखी सुधार आला. तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली. ज्यानंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जावर अंडर – 20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौैप्यपदक मिळवत इतिहास रचला आहे.
स्पर्धेत दुसऱ्या प्रयत्नातील उडी मारल्यानंतर शैली पहिल्या स्थानावर होती, मात्र स्वीडनच्या अक्सागने तिच्यापेक्षा एक सेंटीमीटर लांब उडी मारून तिला दुसऱ्या स्थानावर ढकलले आणि सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकल्याने शैली खूप निराश झाली होती. ज्यामुळे स्पर्धा होताच तिला रडू आलं. दरम्यान तिचे प्रशिक्षक अंजू आणि रॉबर्ट यांना विश्वास आहे की, भविष्यात शैली अप्रतिम कामगिरी करुन नक्कीच भारताला आणखी पदकं मिळवून देईल.
इतर बातम्या
U-20 World Athletics : भारताच्या शैली सिंहला लांब उडीत रौप्य, छोट्याशा फरकाने सुवर्णपदकाची हुलकावणी
(Single mother Daughter shaili singh Won silver medal for india U-20 World Athletics)