टी 20 वर्ल्डकप संपल्यानंतर लीजेंड्सची वर्ल्ड चॅम्पियनशीप सुरू झाली आहे. लीजेंड्सची वर्ल्ड चॅम्पियनशीची सेमीफायनल आज होणार आहे. सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने उभे ठाकणार आहेत. हा सामना अत्यंत रोमांचक होणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास भारत थेट फायनलमध्ये जाणार आहे. युवराज सिंग भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व वेगवान गोलंदाज ब्रेटली करत आहे.
हा सामना इंग्लंडच्या नॉर्थम्प्टनमध्ये सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया अनेकदा आंतरराष्ट्रीय सामन्यात एक दुसऱ्यांच्या विरोधात आमनेसामने आले आहेत. 2003च्या विश्वचषकात, 2011च्या विश्वचषक क्वॉर्टर फायनलमध्ये, 2023च्या विश्वचषकात आणि 2024च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडले होते. त्यामुळेच आज हे दोन्ही संघ आमने सामने येणार असल्याने आजचा सामना रोमांचक ठरणार आहे.
युवराज सिंग, सुरेश रैना, पठाण बंधू, रबित उथप्पा आणि इतर खेळाडू टीम इंडियाच्या संघात आहे. बाकी ऑस्ट्रेलियन संघात ब्रेटली, एरोन फिंच, टिम पेन आदी आहेत. हा सामना रात्री 9 वाजता स्टार स्पोर्ट्सवर सुरू होणार आहे.
दोन्ही संघाकडे पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. कुणालाही कमी लेखता येणार नाही. दोन्ही संघाकडे बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग ऑर्डर मजबूत आहे. त्यामुळेच कोणता संघ जिंकेल हे सांगणं अशक्य आहे. मात्र, युवराज सिंग कर्णधार म्हणून धमाकेदार इनिंग खेळेल अशी आशा सर्वजण व्यक्त करत आहेत.