भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूर याठिकाणी डेस्टिनेशन विवाहसोहळा पार पडला. पी. व्ही. सिंधूने बिझनेसमन वेंकट दत्ताशी लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता यांनी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केलंय. यावेळी तिने चंदेरी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर भरजरी दागिने घातले होते. तर वेंकटने त्याच रंगसंगतीचा कुर्ता आणि धोती परिधान केली आहे. सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमध्ये पी. व्ही. सिंधू आणि वेंकट हात जोडून नमस्कार करताना दिसत आहेत. तर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत त्यांना आशीर्वाद देत आहेत.
22 डिसेंबर रोजी पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. सिंधूने अद्याप तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेले केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘काल उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत आपली बॅटमिंटन चॅम्पियन, ऑलिम्पियन पी. व्ही. सिंधूच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहून मला खूप आनंद झाला. मी या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला’, असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
Pleased to have attended the wedding ceremony of our Badminton Champion Olympian PV Sindhu with Venkatta Datta Sai in Udaipur last evening and conveyed my wishes & blessings to the couple for their new life ahead.@Pvsindhu1 pic.twitter.com/hjMwr5m76y
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) December 23, 2024
गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसुद्धा या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. पी. व्ही. सिंधू आणि आयटी प्रोफेशनल वेंकट दत्ता साईचं लग्न उदयपूरमधील राफेल्स हॉटेलमध्ये धूमधडाक्यात पार पडलं. यानंतर 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पाहुण्यांसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या रिसेप्शनला क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सिंधूचा पती वेंकट दत्ता साई हा हैदराबादस्थित पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीजमध्ये कार्यकारी संचालक या पदावर आहे. तो प्रतिभावान व्यावसायिक आणि अनुभवी उद्योजकसुद्धा आहे. वेंकट दत्ता साईने वित्त, डेटा सायन्स आणि मालमत्ता व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्याने JSW मध्ये इंटर्न आणि इन-हाऊस सल्लागार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्याच कार्यकाळात त्याने JSW च्या मालकीच्या दिल्ली कॅपिटल्सचं व्यवस्थापन केलं होतं.