Ranji Trophy : सरफराजच्या भावाच्या अपघातामुळे मुंबईच्या टीममध्ये नशिबाने संधी मिळालेल्या 12 वी च्या मुलाची कमाल, थेट…

| Updated on: Oct 19, 2024 | 8:40 AM

Ranji Trophy : क्रिकेटसाठी दररोज आयुषला 80 किमी प्रवास करावा लागतो. अपघाताने त्याला मुंबईच्या रणजी टीममध्ये संधी मिळाली. त्याने या संधीच सोनं केलं. आयुष आता 12 वी मध्ये आहे. मुंबई क्रिकेटमधील या नव्या टॅलेंटबद्दल जाणून घ्या.

Ranji Trophy : सरफराजच्या भावाच्या अपघातामुळे मुंबईच्या टीममध्ये नशिबाने संधी मिळालेल्या 12 वी च्या मुलाची कमाल, थेट...
ayush mhatre
Image Credit source: PTI
Follow us on

पृथ्वी शॉ भले फॉर्ममध्ये नसला, तरी त्याची बॅट मात्र चांगलीच तळपत आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध महाराष्ट्र सामन्यात असच काहीतरी पहायला मिळालं. महाराष्ट्राचा डाव 126 धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबईची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. त्यावेळी 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेने दमदार बॅटिंग केली. रणजी स्पर्धेत त्याने पहिलं शतक झळकावलं. आयुषने पृथ्वी शॉ च्या बॅटने खेळताना ही कमाल केली. आयुष आता 12 वी मध्ये आहे. सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खानच्या जागी त्याला मुंबईच्या टीममध्ये संधी मिळाली आहे.

महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या दिवसाच्या खेळात आयुष म्हात्रेने शतक ठोकलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आयुष 127 धावांवर नाबाद होता. यात 17 चौकार आणि 3 षटकार आहेत. मुंबईच्या या युवा खेळाडूने दिवसाचा खेळ संपल्यानंतर बोलताना सांगितलं की, त्याने हा कारनामा पृथ्वी शॉ च्या बॅटने केला. रणजी ट्रॉफीमध्ये बडोदा विरुद्ध डेब्युनंतर पृथ्वी शॉ ने ही बॅट दिल्याच आयुषने सांगितलं.

आयुषच शतक, पृथ्वी शॉ ने किती धावा केल्या?

आयुषने सांगितलं की, मी पृथ्वी शॉ कडे त्याची बॅट मागितली आणि त्याने ती देऊन टाकली. त्याच बॅटने आज मी शतकी खेळी केली. आयुष विरारला राहतो. पृथ्वी शॉ सुद्धा विरारचा आहे, त्यामुळे त्यांची ओळख आधीपासूनच आहे. खासबाब म्हणजे ज्याच्या बॅटने आयुषने शतक ठोकलं, त्याच्यासोबतच आयुषने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी ओपनिंग केलेली. महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये पृथ्वी अपयशी ठरला. त्याने फक्त 1 रन्स केला.

रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध आयुषच प्रदर्शन कसं?

आयुष म्हात्रे मुंबईच्या टीममध्ये मुशीर खानच्या जागी खेळतोय. इराणी कप आधी मुशीर रस्ते अपघातात जखमी झाला. त्यामुळे तो टीमच्या बाहेर आहे. इराणी कपमध्ये रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध आयुष फार काही करु शकला नव्हता. दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याने 33 धावा केल्या होत्या. पण बडोदे विरुद्ध त्याने रणजी करियरची सुरुवात अर्धशतकाने केली होती. आता महाराष्ट्राविरुद्ध दुसऱ्या रणजी सामन्यात त्याने थेट शतकी खेळी केलीय.

रोज 80 किलोमीटरचा प्रवास

आयुष वयाच्या 5 व्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय. पण खऱ्या अर्थाने त्याने वयाच्या 15 व्या वर्षापासून क्रिकेटवर जास्त फोकस केला. आयुषच त्यावेळी शालेय आणि क्लब क्रिकेटमध्ये नाव झालेलं. त्याची व्यक्तीगत सर्वाधिक धावसंख्या 254 आहे. आयुषला क्रिकेटमध्ये करियर करायच होतं. त्याच्या या स्वप्नाला आई-वडील, आजोबा, काका यांनी फुल सपोर्ट केला. क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी तो रोज विरार ते चर्चगेट असा 80 किलोमीटरचा प्रवास करतो. या कठोर मेहनतीमुळेच आज त्याला मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालय.