मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या नव्या मोसमाचं बिगुल वाजलं आहे. आयपीएलसाठी जयपूरमध्ये खेळाडूंचा लिलावही झाला. अनेक नव्या खेळाडूंना ‘भाव’ मिळाला आहे. आयपीएलच्या आगामी मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु असताना, एक गोष्ट तिथे उपस्थित आणि प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली, ती म्हणजे रिचर्ड मॅडली यांची अनुपस्थिती. गेली 11 वर्षे आयपीएलच्या लिलावात बोली लावण्याची धुरा सांभाळणारे रिचर्ड मॅडली हे यंदा लिलावाच्या कार्यक्रमात दिसलेच नाहीत. त्यांच्याऐवजी ह्यूज एडमिड्स यांना संधी देण्यात आली होती.
भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या बीसीसीआयने रिचर्ड मॅडली यांना आयपीएलच्या लिलावाच्या कार्यक्रमात यंदा न घेण्याचा निर्णय घेतला. रिचर्ड मॅडली यांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआयने विश्वासात न घेताच अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या निर्णयामुळे आपण निराश आणि दु:खी असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. कारण, आयपीएलच्या लिलावातून बाहेर पडण्याचा निर्णय आपला नसल्याचे मॅडली सांगतात. आयपीएलच्या गेल्या 11 मोसमांच्या लिलाव कार्यक्रमात ऑक्शनर म्हणून मी काम केले असल्याने अशाप्रकारे बीसीसीआयचा निर्णय माझ्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
रिचर्ड मॅडली यांच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मला माहित होतं की, यंदा आयपीएलच्या लिलावात ऑक्शनर म्हणून काम करायचे आहे. मात्र, नंतर बीसीसीआयकडून अचानक मेल आली, ज्यात तुमच्यासोबतचा करार संपत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही तुमच्या जागी दुसऱ्या ऑक्शनरचा शोध घेत असल्याचेही मेलमध्ये म्हटले होते. धक्कादायक म्हणजे, रिचर्ड मॅडली यांनी 11 वर्षे ऑक्शनर म्हणून काम केल्यानंतरही बीसीसीआयने साधे ‘धन्यवाद’ म्हणत मॅडली यांचे आभारही मानले नाहीत. मॅडली यांना ऑक्शनर म्हणून का घेतले गेले नाही, याचे कारणही त्यांना अद्याप सांगितले गेले नाहीय.
बीसीसीआयने रिचर्ड मॅडली यांचे आभार मानले नसले, तरी रिचर्ड मॅडली हे भारतीयांचे आभार मानायला विसरले नाहीत. त्यांनी भारतीय क्रिकेट रसिकांचे आभार मानले असून, नवे ऑक्शनर असलेल्या ह्यूज एडमिड्स यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
I hope that today’s #IPL auction is a huge success.
Thank you to my many friends throughout India for your kind wishes ?????????
Good luck to Hugh Emeades.
Richard “The Hammerman “Madley#SOLD
— Richard Madley (@iplauctioneer) December 18, 2018
नवीन ऑक्शनर कोण आहेत?
ह्यूज एडमिड्स यांनी आयपीएलच्या यंदाच्या लिलावात ऑक्शनर म्हणून भूमिका बजावली. ह्यूज एडमिड्स हे प्रोफेशनल ऑक्शनर आहेत. 1984 सालापासून ह्जूज एडमिड्स यांनी लिलाव कार्यक्रमात ऑक्शनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे 2300 लिलाव त्यांनी केले आहेत.
जवळपास 30 वर्षांचा लिलावांचा एडमिड्स् यांच्याकडे अनुभव असला, तरी क्रिकेटविश्वात त्यांचा अनुभव फारसा नाही. पेंटिंग्स, जुन्या कार किंवा चॅरिटी लिलाव इत्यादी लिलावांमध्ये ह्यूज एडमिड्स ऑक्शनर म्हणून काम केले आहे.
Meet the VIVO IPL auctioneer, Hugh Edmeades #IPLAuction pic.twitter.com/UdgPwEKlSg
— IndianPremierLeague (@IPL) December 17, 2018