गोविंद ठाकूर, मुंबई दि. 19 नोव्हेंबर | वनडे वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा आज आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप क्रिकेटचा फाइनल सामना रंगणार आहे. सलग सर्व सामने जिंकून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आता रोहित शर्मा यांच्याकडे महेंद्रसिंह धोनी याच्या संघाने केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा याचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 2011 मध्ये काय झाले होते आणि आता 2023 मध्ये काय होणार? हे सांगितले. रोहित शर्मा याने विश्वकरंडकावर भारताचे नाव कोरण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा याने बालपणीचे कोच असलेले दिनेश लाड यांची भेट घेतली होती. त्यावेळी रोहित शर्मा याने आपणास वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवू, असे आश्वासन दिले होते. रोहित याचे आश्वासन आणि भारतीय संघाची कामगिरी पाहिल्यानंतर मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की, भारतीय टीम चांगली खेळत आहे. यामुळे भारत संघ अंतिम सामन्यात विजय मिळवेल. आजचा सामना जिंकल्याने 130 कोटी भारतीयांना टीम इंडिया दीपावली भेट देणार आहे. दिनेश लाड यांनीही टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिनेश लाड यांनी सांगितले की, 2011 मध्ये वर्ल्ड कप संघात रोहित शर्मा याचा समावेश झाला नव्हता. त्यानंतर त्याला घरी बोलवून चांगलेच फटकारले होते. तुझा चांगला अभ्यास झाला नाही. त्यामुळे कामगिरी चांगली झाली नाही. त्यावेळी रोहित म्हणाला होतो, सर, आता यापुढे तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. त्यानंतर रोहित याने फलंदाजीतून अनेक नवनवीन विक्रम केले. रोहित शर्मा 12 वर्षांचा असताना दिनेश लाड यांची नजर त्याच्यावर पडली होती. त्यावेळी रोहित शाळेच्या संघातून ऑफ स्पिनर गोलंदाजी करत होता. दिनेश लाड यांनी त्याला फलंदाज बनवले आणि रोहितने टीम इंडियापर्यंत मजल मारली.