औरंगाबादः नवरात्रीच्या मुहूर्तावर औरंगाबादची सायकलपटू सोनम शर्मा (Sonam Sharma) हिने तमाम सायकलपटूंसाठी प्रेरणादायी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. औरंगाबादच्या या कुशल सायकल पटूने एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्सचा (Super Randonneurs ) किताब संपादन केला आहे. वर्षभरात ठराविक किलोमीटरचा प्रवास करण्याचा उद्देश समोर ठेवत, या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सायकल टुरिझमचा (Cycle tourism)छंद जपणाऱ्या सोनम शर्मा हिने या वर्षभरातून दोन वेळा हे टार्गेट पूर्ण करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
बीआरएम’ म्हणजेच Brevets de Randonneurs Mondiaux. या मूळ फ्रेंच वाक्याचा इंग्रजी अर्थ ‘वर्ल्डवाईड हायकर्स पेटेन्टस्’ असा होतो. म्हणजेच ‘जगभर कुठेही दूरवर रपेटीला जाणारा’. फ्रान्समधील अॅडॉक्स क्लब पॅरिसिअन ही संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देते आणि ‘बीआरएम’चं आयोजनही करते. विशिष्ट वेळेच्या मर्यादेत स्पर्धेतील राइड्स पूर्ण केल्या पाहिजेत, असा नियम असतो. सुपर रॅन्डोनिअर्स ही स्पर्धा एका वर्षात 200 किमी, 300 किमी, 400 किमी, 600 किमी अंतराची मालिका असते. ही स्पर्धा ऑक्टोबर ते ऑक्टोबर 2020/21 या काळात ही मालिका पूर्ण करायची होती. ती पार केल्यानंतर सुपर रॅन्डोनिअर्सचा किताब मिळतो. औरंगाबादच्या सोनम हिने दोन वेळा ही मालिका पूर्ण केली. अशा प्रकारे दोन वेळा हा किताब स्वतःच्या नावावर करणारी ही मराठवाड्यातील पहिली महिला सायकलपटू ठरली आहे.
बीआरएमच्या अॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सायकलपटूंना या स्पर्धेत सहभागी होता येते. रँडोनीअरिंग म्हणजेच स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग. पण ते करत असताना इतरांना मदत करणं आणि सहभागी सायकलस्वारासोबत स्पर्धा न करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. स्वत:सोबत इतरांनाही पुढे घेऊन जाणं हा ‘बीआरएम’चा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच बीआरएम ही शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती कस काढणारी स्पर्धा आहे.
बीआरएमची मालिका एका वर्षात दोन वेळा पूर्ण केल्याबद्दल सोनम यांच्यावर सायकलप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोनमचे औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर सचिव चरणजीत सिंग संघा, अतुल जोशी, अमोघ जैन, मनिष खंडेलवाल, हरिश्चंद्र म्हात्रे, कविता जाधव,डॉ प्रेरणा देवकर, परिनीता खैरनार यांनी शुभेच्छा दिल्या.
इतर बातम्या-