राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना झटका, सर्वोच्च न्यायालयाने फुटबॉल संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन हटवलं

| Updated on: May 18, 2022 | 8:05 PM

भारतीय फुटबॉल संघटनेच्या निवडणुका डिसेंबर 2020 मध्ये होणार होत्या. पण फुटबॉल संघटनेने आपल्या संविधानाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगून निवडणूक टाळली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना झटका, सर्वोच्च न्यायालयाने फुटबॉल संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन हटवलं
प्रफुल्ल पटेल
Image Credit source: file photo
Follow us on

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन प्रफुल्ल पटेल (praful patel) यांना हटवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने AIFF चा प्रशासकीय कार्यभार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती अनिल आर देव, माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एसएफ कुरैशी आणि माजी भारतीय कर्णधार भास्कर गांगुली यांच्या (COA) समितीकडे सोपवला आहे. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमुर्ती डी.वाय.चंद्रचूड, न्यायमुर्ती सूर्यकांत आणि न्यायामुर्ती पीएस नरसिम्हा यांनी हा आदेश दिला. नव्या निवडणुका होईपर्यंत ही समिती देशातील फुटबॉल कार्यक्रमाचं संचालन करेल.

निवडणूक टाळली होती

भारतीय फुटबॉल संघटनेच्या निवडणुका डिसेंबर 2020 मध्ये होणार होत्या. पण फुटबॉल संघटनेने आपल्या संविधानाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगून निवडणूक टाळली. प्रफुल्ल पटेल यांनी डिसेंबर 2020 मध्ये AIFF अध्यक्ष म्हणून आपला तिसरा कार्यकाळ आणि 12 वर्ष पूर्ण केली. नियमांनुसार, अध्यक्ष म्हणून हा जास्त कार्यकाळ आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांना हटवण्याचा आदेश दिला.

तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था

ही तात्पुरत्या स्वरुपाची अशी व्यवस्था आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. निवडणुका घेण्यासाठी ही व्यवस्था केल्याचं कोर्टाने सांगितलं. संविधानिक आणि लोकशाही पद्धतीने कारभार झाला पाहिजे. निवडणुका लवकरात लवकर होतील, अशी कोर्टाने अपेक्षा व्यक्त केली. 12 मे रोजी दिल्ली फुटबॉल संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालय राजी झालं होतं. AIFF चे अध्यक्ष आणि त्यांची समिती बेकायदेशीर पद्धतीने पदावर कायम असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. प्रफुल्ल पटेल हे राजकीय नेते सुद्धा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी ते संबंधित असून त्यांनी केंद्रात मंत्रिपदही भूषवलं आहे.