मँचेस्टर : यंदाच्या वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरोधातील सामना भारताने दमदार खेळीने जिंकला. भारताच्या विजयात ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा वाटा मोलाचा ठरला. रोहित शर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुव्वा उडवला आणि 113 चेंडूत 140 धावा केल्या. या खेळीत रोहित शर्माने 14 चौकार आणि 3 षटकारही लगावले.
भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानला कुठल्याही स्थितीत इतकी धावसंख्या पार करणं शक्य नव्हतं. मात्र, त्यात पावसाने व्यत्यय आणला आणि पाकिस्तानसमोरील आव्हान आणखी वाढलं. अखेर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 89 धावांनी भारताने पाकिस्तानवर मात केली.
या धडाकेबाज खेळीनंतर टीम इंडियाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपस्थिती एका पाकिस्तानी पत्रकाराने रोहित शर्माला प्रश्न विचारला, “पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. जर या अत्यंत वाईट अवस्थेतून पाकिस्तानी फलंदाजांना बाहेर येण्यासाठी तुम्ही त्यांना कोणता सल्ला द्याल?”
पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिलेल्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. रोहित शर्माने अगदी हसत-हसत पाकिस्तानी पत्रकाराला उत्तर दिले की, “जर मी पाकिस्तानचा क्रिकेट प्रशिक्षक बनलो, तर सांगेन. आता मी काय सांगणार?”
रोहित शर्माच्या या उत्तरानंतर उपस्थित पत्रकार आणि इतर लोकांमध्ये एकच हशा पिकला. सर्वजण खळखळून हसले.
क्रिकेट वेबसाईट espncricinfo ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, सगळेजण रोहित शर्माच्या या अफलातून उत्तराचा आनंद घेताना दिसत आहेत.
VIDEO : पाहा रोहित शर्माने पाकिस्तानी पत्रकाराला काय उत्तर दिले?