मुंबई : क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधीच उरला आहे. वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांनी आपापले संघही जाहीर केले आहेत. बीसीसीआयच्या निवड समितीने 15 एप्रिल रोजी टीम इंडियातील 15 खेळाडूंची घोषणा केली होती. टीम इंडियात दिनेश कार्तिकचाही समावेश आहे.
बीसीसीआयने वर्ल्डकप टीम जाहीर करताच क्रिकेट रसिकांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. ही चर्चा विशेषत: दिनेश कार्तिकला टीममध्ये घेण्यावरुन आणि ऋषभ पंतला टीममधून डावलण्यावरुन रंगली होती. कार्तिकच्या समावेशाबाबत आणि पंतला डावलण्याबाबतच्या निर्णयावर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावर आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने स्वत: पुढे येत भूमिका मांडली आहे.
कार्तिकबद्दल विराट कोहली नेमकं काय म्हणाला?
“मॅच फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकची कामगिरी सर्वोत्तम आहे. त्यामुळेच निवड समितीच्या सर्व सदस्यांचे दिनेश कार्तिकच्या नावावर एकमत झालं.” असे सांगत विराट कोहली पुढे म्हणाला, “दिनेश कार्तिककडे अनुभव आहे. ईश्वर न करो, पण सामना खेळत असताना धोनी बाद झाला, तर त्याच्यानंतर कार्तिक महत्त्वपूर्ण ठरु शकतो. फिनिशर म्हणून त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.”
“दिनेश कार्तिक दबाव असतानाही धाडस आणि धैर्याने खेळतो. त्यामुळेच ऋषभ पंतला मागे टाकत कार्तिकची निवड झाली आहे.” असेही विराट म्हणाला.
IPL मधील कार्तिक आणि पंतच्या खेळीची तुलना
यंदाच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतने 16 सामन्यात 37.53 टक्क्यांच्या सरासरीने 488 धावा केल्या, तर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून दिनेश कार्तिकने 14 सामन्यात 31.62 टक्क्यांच्या सरासरीने 253 धावा केल्या.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी
वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये कोण कोण आहे?