मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेल्या टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धा अखेर संपल्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये रविवारी 5 सप्टेंबरला अखेरचे खेळ खेळवण्यात आले. आता या स्पर्धेची सांगता झाली आहे.
टोक्योच्या नॅशनल स्टेडियममध्ये पॅरालिम्पिक खेळांची सांगता झाली. भारताने या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत 19 पदकं खिशात घातली. हे भारताचं आतापर्यंतच सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.
पदक मिळवण्याचा विचार करता चीनने सर्वाधिक पदकं खिशात घातली. चीन देशाने तब्बल 207 पदकांवर आपलं नाव करत दुहेरी शतक झळकावलं. पदक टॅलीमध्ये चीन टॉपवर राहिला. त्यांनी 96 सुवर्ण, 60 रौप्य आणि 51 कांस्य पदकं मिळवली. तर दुसऱ्या स्थानावर ग्रेट ब्रिटेन आहे.
दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या ग्रेट ब्रिटेनने 124 पदकं पटकावली आहेत. त्यांनी 41 सुवर्ण, 38 रौप्य आणि 31 कांस्य पदक मिळवली आहेत.तिसऱ्या स्थानावर अमेरिका असून 37 सुवर्ण, 36 रौप्य आणि 31 कांस्य पदकासह त्यांची पदक संख्या 104 आहे. तर अमेरिकेपेक्षा सुवर्णपदकं कमी असणाऱ्या रशिया पॅरालिम्पिक कमिटीला 118 पदकांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. तर 59 पदकांसह नेदरलँड पाचव्या स्थानावर आहे.
या पदकांच्या शर्यतीत भारत 19 पदकांसह 24 व्या स्थानावर विराजमान आहे. भारताने 5 सुवर्णपदकं, 8 रौप्य पदकं आणि 6 कांस्यपदकांसह हे स्थान मिळवलं आहे. आतापर्यंच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.