Tokyo Olympic 2020 टोकियो : भारताचा भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो आॉलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. सगळ्या भारतीयांच्या नजरा आज नीरजच्या कामगिरीकडे लागल्या होत्या.
अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून शिक्षण आणि खेळाची सांगड घालत नीरज मोठा झाला. नीरज चोप्राचा जन्म 27 डिसेंबर 1997 ला हरयाणाच्या पानीपत जिल्ह्यातल्या खांद्रा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. नीरजने आपलं शिक्षण चंडीगढमधून पूर्ण केलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नवह्ती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला.
2016 मध्ये भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर 2016 मध्ये नीरजने पोलंडमध्ये झालेल्या IAAF अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 86.48 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदक पटकावलेलं. अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक स्तरावरच्या अॅथलेटिक स्पर्धेत पदक पटकवणारा नीरज दुसरा भारतीय ठरला होता. या कामगिरीनंतर नीरजची भारतीय सेनेत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
2018 मध्ये इंडोनेशियाच्या जकार्ता इथं एशियन्स गेम्समध्ये नीरजने 88.06 मीटर दूर भालाफेक केला होता. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर 2018 मध्ये नीरजच्या खांद्याला दुखापत झाली होती. या कारणाने तो अनेक दिवस खेळापासून दूर होता. 2019 मध्ये त्याला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याला अनेक स्पर्धांपासून मुकावं लागलं होतं.
यावर्षी मार्च महिन्यात पुनरागमन करताना नीरजने इंडियन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत 88.07 मीटर भाला फेकत स्वतःचाच नॅशनल रेकॉर्ड तोडला होता. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या निवड चाचणीत नीरजने 87.86 मीटर भालाफेक केला होता. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होण्यासाठी 85 मीटर भालाफेक करणं आवश्यक होतं. त्यानंतर आता टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
भालाफेकीत नीरज चोप्राने धडाकेबाज सुरुवात केली. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या फेरीत नीरजने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला. तर नीरजचा चौथा थ्रो फाऊल ठरला. त्यानंतर त्याचा पाचवा थ्रो देखील फाऊल ठरला. सहाव्या फेरीत नीरजनं 84 मीटर थ्रो फेकला. आणि त्याने सुवर्णपदकाचा वेध घेतला. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून 6 कोटी जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :