Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघाची खराब सुरुवात, सलामीच्या सामन्यात दारुण पराभव

| Updated on: Jul 24, 2021 | 7:19 PM

भारताच्या पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली असतानाच महिलांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँड महिला संघाने 5-1 ने भारताला मात दिली आहे.

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघाची खराब सुरुवात, सलामीच्या सामन्यात दारुण पराभव
भारतीय महिला हॉकी संघ पराभूत
Follow us on

टोक्यो : भारतीय हॉकीसाठी आजचा दिवस ‘थोडी खुशी, थोडा गम’ असाच काहीसा होता. सकाळी पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंड संघावर 3-2 च्या फरकाने अप्रतिम विजय मिळवला. पण सायंकाळी महिला हॉकी संघाला नेदरलँडकडून 5-1 असा लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. शनिवारी 24 जुलै रोजी भारताच्या दिवसातील शेवटच्या स्पर्धेत भारतीय महिलांना नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला.

तीन वेळा ऑलिम्पिक विजेता संघ नेदरलँडने सलामीच्या सामन्यात सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. सामना सुरु होताच पहिला गोल करत नेदरलँड संघाने सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर 10 व्या मिनिटाला लगेचच भारताची कर्णधार राणीने गोल करत सामन्यात भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर बराच वेळ दोन्ही संघाना गोल करता आला नाही. पण अखेरच्या काही मिनिटांत नेदरलँड संघाने तुफानी खेळी करत एका मागोमाग एक गोल करत 4 गोल केले आणि 5-1 च्या फरकाने सामना जिंकला. भारतीय महिलांचा पुढील सामना 26 जुलैला जर्मनी संघासोबत होणार आहे.

पुरुष संघाचा रोमहर्षक विजय

भारत आणि न्यूझीलंड पुरुष संघात झालेल्या सामन्यात पहिला गोल न्यूझीलंड संघाने केला. कीवी टीमने सामन्याच्या पहिल्या 2 मिनिटांतच गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर भारताला मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर भारताने एक गोल करत सामन्यात बरोबरी साधली. भारताच्या हरमनप्रीत सिंगने हा पहिला गोल केला. मॅचच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीवर होते. सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आपली पकड मजबूत करत न्यूझीलंडच्या गोलपोस्टमध्ये दूसरा गोल दागला. भारताच्या रूपिंदर पाल सिंगने हा गोल केला. त्यानंतर पुन्हा हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल करत भारताला 3-1 ची आघाडी मिळवून दिली. पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या खेळाडूने गोल करत सामना 3-2 च्या स्थितीत आणून ठेवला. ज्यानंतर अखेरच्या काही मिनिटांमध्ये न्यूझीलंडने गोल करण्याचे खूप प्रयत्न केले त्यांना 3 पेनल्टी कॉर्नर देखील मिळाले. पण भारतीय गोलकीपर श्रीजेश उसकीने अप्रतिम गोलकिपींग करत भारताचा विजय निश्चित केला.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : भारतीय हॉकी संघाची विजयी सुरुवात, न्यूझीलंड संघावर रोमहर्षक विजय

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

Tokyo Olympics 2021 : तिरंदाजी मिक्स्ड टीम स्पर्धेतून भारत बाहेर, दीपिका, प्रवीणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

(Tokyo Olympics 2021 Indian Women Hocky team defeated by Netharland with 5-1)