मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण अफ्रिकेचं आव्हान आहे. टीम इंडियासाठी सकारात्मक सुरुवात झाली असून नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार उदय सहारन याने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारत असल्याचं सांगितलं. त्यामुळे टीम इंडियापुढे दक्षिण अफ्रिकेला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान असणार आहे. कारण होम पिच असल्याने दक्षिण अफ्रिका भारतावर वरचढ होऊ शकते. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर उदय सहारन याने गोलंदाजी घेण्याचं कारण स्पष्ट केलं. “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. सकाळी वातावरण गोलंदाजीसाठी पूरक आहे. तसेच ही आमच्यासाठी नवीन विकेट आहे. आम्ही प्रथम गोलंदाजी करण्यास तयार होतो. आम्ही दोन वेळा नाणेफेक गमावली त्यामुळे आम्हाला नेहमीच फलंदाजी करावी लागली. आम्ही पूर्णपणे तयार आहोत, दबाव आणि बाहेरचा प्रेक्षकांची आम्हाला चिंता नाही. आम्हाला आमच्या प्लानची अंमलबजावणी करायची आहे”, असं उदय सहारन याने सांगितलं.
भारताने गोलंदाजी स्वीकारल्याने दक्षिण अफ्रिकन कर्णधार जुआन जेम्स याने दु:ख व्यक्त केला आहे. अगदी मनाविरुद्ध झाल्याचं त्याने सांगितलं. “आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायलाही आवडले असते. फक्त प्लेयर्सनी तिथं जाऊन आनंद घ्यावा असं वाटतं. आमच्याकडे आत्मविश्वास आहे. आम्ही त्यांना दोनदा पराभूत केले आहे.” असं जुआन जेम्स याने सांगितलं. तर संघात एक बदल केल्याचं त्याने स्पष्ट केलं.
एकंदरीत पिच रिपोर्ट पाहता भारताने गोलंदाजीचा घेतलेला निर्णय योग्य आहे. खेळपट्टी कोरडी आहे आणि या ट्रॅकवर वेगवान गोलंदाजांना फायदा होईल. तसेच सरळ 82 मीटर लांब षटकार आहे. तर लेग साई़ला बाउंड्री 67 मीटरवर आहे. त्यामुळे कमी धावांवर रोखण्यात यश आलं तर टीम इंडियाचा विजय निश्चित आहे.
दक्षिण आफ्रिका U19 (प्लेइंग इलेव्हन): ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान मारेस, जुआन जेम्स (कर्णधार), ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, न्कोबानी मोकोएना, क्वेना माफाका
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी, सौम्य पांडे