दोहा: अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीच स्वप्न अखेर पूर्ण झालय. वर्ल्ड कप उंचावण्याच मेस्सीच अनेक वर्षांपासूनच स्वप्न अखेर काल साकार झालं. फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी अर्जेंटिनाने फ्रान्सला पेन्लटी शूटआऊटमध्ये 4-2 ने हरवलं. 1986 नंतर अर्जेंटिनासाठी हा खास क्षण आहे. अर्जेंटिनाची टीम पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. कॅप्टन लियोनल मेस्सी या विजयाचा हिरो आहे. वर्ल्ड कपचा अखेरचा सामना खेळणाऱ्या मेस्सीने आपलं मोठ स्वप्न पूर्ण केलं.
कुटुंबासोबत सेलिब्रेशन
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मेस्सीने आपल्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन केलं. मेस्सीची बायको एंटोनेला रोकुजो आणि त्याची तिन्ही मुलं मैदानात आली होती. वर्ल्ड कप विजयानंतर अवॉर्ड सेरेमनी झाली. त्यावेळी मेस्सीच पूर्ण कुटुंब मैदानात हजर होतं. मेस्सीने वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन पूर्ण कुटुंबासोबत फोटो काढला.
मेस्सी-एंटोनेलाची लव्ह स्टोरी
मेस्सी आणि त्याची बायको एंटोनेला रोकुजोची लव्ह स्टोरी खूप खास आहे. लहानपणापासून दोघे एकत्र आहेत आणि अजूनपर्यंत ही जोडी कायम आहे. वयाच्या 5 व्या वर्षी लियोनल मेस्सी आणि एंटोनेलाची पहिल्यांदा भेट झाली. अर्जेंटिनाच्या रोसारियोमध्ये मेस्सीच लहानपण गेलं. त्याच ठिकाणी एंटोनेलाला तो पहिल्यांदा भेटला.
पहिली भेट कधी झाली?
Newell’s Old Boys क्लबकडून खेळताना लियोनल मेस्सी आपल्या मित्राच्या घरी डिनरसाठी गेला. त्यावेळी त्याची ओळख टीमच्या मिडफिल्डरच्या चुलत बहिणीशी झाली. ही होती एंटोनेला रोकुजो. सुरुवात मैत्रीने झाली. वयाच्या 11 व्या वर्षी मेस्सीने अर्जेंटिना सोडलं. तो बार्सिलोनाला शिफ्ट झाला.
दु:खद घटनेनंतर दोघे पुन्हा एकत्र
लियोनेल मेस्सी बार्सिलोनाला शिफ्ट झाल्यानंतर एंटोनेलासोबतच्या त्याच्या भेटीगाठी बंद झाल्या. 2004 पर्यंत दोघे एकमेकांपासून लांबच होते. पण एका दु:खद घटनेनंतर दोघे पुन्हा परस्परांच्या जवळ आले. एंटोनेला रोकुजोच्या जवळच्या मित्राचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी मेस्सीने एंटोनेलाला धीर दिला.
रिलेशनशिप पब्लिक कधी केली?
तेव्हापासून दोघांमध्ये पुन्हा चर्चा सुरु झाली. दोघे परस्परांचे चांगले मित्र बनले. 2009 मध्ये मेस्सी आणि एंटोनेलाने आपली रिलेशनशिप पब्लिक केली. 2012 मध्ये या जोडप्याला पहिलं बाळ झालं. एंटोनेलाने एका मुलाला जन्म दिला.
एंटोनेला रोकुजो काय करते?
एंटोनेला रोकुजो मॉडेल आणि बिझनेस वुमन आहे. 2016 मध्ये तिने Ricky Sarkany सोबत मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट साइन केलं. 2017 मध्ये तिने बुटीक चेन सुरु केली. एंटोनेला प्रत्येक सामन्यात मेस्सीच समर्थन करताना दिसते.