नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे सरकार अलर्ट मोडवर आलय. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेच निमंत्रण दिलय. सरकारला आता लवकरात लवकर या वादावर तोडगा शोधायचा आहे. हा वाद आणखी न वाढवण्याची सरकारचा प्रयत्न आहे. आज खाप महापंचायत होणार आहे. त्याच्याबरोबर एक दिवस आधी मंगळवारी रात्री अनुराग ठाकूर यांनी टि्वट करुन आंदोलक कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावलं.
याआधी जानेवारी महिन्यात सुद्धा आंदोलक कुस्तीपटू आणि क्रीडा मंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. आता पुन्हा एकदा सरकारने कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावलय.
कधीपर्यंत सरकारला वाद मिटवायचाय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलक कुस्तीपटू लवकरच सरकारसोबत चर्चा सुरु करतील. शनिवारी रात्री सुद्धा कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी शेवटच्या टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी सरकारला हा वाद मिटवायचा आहे.
सरकार आता का वाद मिटवण्याचा प्रयत्न करतेय?
कुस्तीपटूंचा हा वाद आणखी वाढला, तर पक्षाच नुकसान होईल, असं सत्ताधारी भाजपाला वाटतं. 28 मे रोजी जंतर-मंतरवर कुस्तीपटूंना खेचत, ओढत नेल्याचे फोटो समोर आले. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसलाय. आंदोलक कुस्तीपटू एक महिन्यापासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले होते. पोलिसांकडून परवानगी नसल्यामुळे कुस्तीपटूंच आंदोलन संपलं. पण विरोध अजूनही कायम आहे.
सरकारला कुठल्या मतांची चिंता?
कुस्तीपटूंना ओढत-खेचत नेल्याच्या फोटोंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार झालाय. त्यामुळे भारत सरकारच्या प्रतिमेला धक्का बसलाय. दुसऱ्या बाजूला भाजपाला जाट मतांची चिंता आहे. खाप पंचायती या आंदोलनात उतरल्याने शेतकरी आंदोलनाच्या कटू आठणी ताज्या झाल्या आहेत. त्यामुळे सरकारला लवकरात लवकर हा वाद मिटवायचा आहे.