मुंबई: अव्वल टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) आज विम्बल्डनच्या (Wimbledon) उपांत्यफेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने कोर्टवर उतरेल. पण तत्पूर्वी त्याच्या फिटनेसच्या (Fitness) समस्येने डोकं वर काढलं आहे. ती चिंता त्याला सतावत आहे. 36 वर्षीय राफेल नदालने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी त्याने ऑल इंग्लंड क्लबच्या कोर्टवर बोटिक व्हॅन डी झँडस्चल्पचा पराभव केला. मागच्याच महिन्यात राफेल नदालने फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावलं. फ्रेंचओपन स्पर्धेतलं त्याचं हे विक्रमी 14 वं जेतेपद आहे. “मी माझ्या शरीराबद्दल बोलून थकलोय, मी आता त्या बद्दल बोलू इच्छित नाही” असं राफेल नदाल म्हणाला. “आताच्या घ़डीला पुढे प्रवास चालू ठेवण्यासाठी आणि मला हवं ते मिळवण्यासाठी मी तंदुरुस्त आहे” असं नदालने सांगितलं.
बुधवारी त्याचा सामना इन फॉर्म टेलर फ्रिट्झ विरुद्ध होणार आहे. आठव्यांदा विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अमेरिकन टेलर फ्रिट्झ पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. फ्रिट्झने उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुब्लेरचे आव्हान ६-३, ६-१, ६-४ असे परतवून लावले. या वर्षाच्या सुरुवातील इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत टेलर फ्रिट्झने राफेल नदालला पराभूत केलं होतं. या पराभवाने नदालची सलग 20 सामन्यातील विजयाची मालिका खंडीत केली होती. क्ले कोर्ट म्हणजे फ्रेंच ओपन स्पर्धेत उतरण्याआधी राफेल नदालला सहा आठवडे विश्रांती घ्यायला भाग पाडलं होतं.
विम्बल्डनचा गतविजेता नोव्हाक जोकोविचनं मंगळवारी एका जबरदस्त चाललेल्या सामन्यात इटलीच्या जॅनिक सिनरचा पराभव करत 11व्यांदा SW19 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सेंटर कोर्टवर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत दोन सेट गमावल्यानंतर जोकोविचनं पुनरागमन करत सिनारचा 5-7, २-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.