मुंबई : आज स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा दिवस. जागतिक महिला दिन. आज महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कतृर्त्वाचा ठसा उमटवतायत. आज असं एकही क्षेत्र नाही, की जिथे तुम्हाला महिलांचा वावर आढळणार नाही. फक्त कार्यालयातच नव्हे, तर फायटर पायलटपासून ते क्रीडांगणावर महिलांनी डोळे दिपवणार यश मिळवलं आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण अशाच एक महिलेची ओळख करुन घेणार आहोत. त्यांच नाव आहे, वैशाली खेडकर जोशी. पेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या वैशाली यांनी पूर्णपणे एक वेगळं क्षेत्र निवडलय. वैशाली मल्लखांबाच्या प्रचार-प्रसारासाठी झटतायत.
मल्लखांबाचा ‘लक्षवेधी वैशाली’ प्रवास
वैशाली जोशी या मैदानावरच्या रणरागिणीचा मल्लखांबाचा लक्षवेधी प्रवास जाणून घेताना विलक्षण जिद्द, कठोर व अविरत परिश्रम, जबरदस्त आत्मविश्वास याचा सुरेख समन्वय दिसून येतो. व्यवसायाने आर्किटेक्ट असणाऱ्या वैशाली यांचा मल्लखांबाचा प्रवास त्यांच्या वडिलांच्या प्रेरणेतून सुरु झाला. व्यवसाय आणि खेळ याची अचूक सांगड घालत या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या दमाच्या तरुणांना त्यांच्याकडून बरंच काही शिकता येण्यासारखं आहे.
वयाच्या ८०व्या वर्षीही मल्लखांब खेळतायेत
आपल्या वडिलांचा आदर्श ठेवत आजही मल्लखांबाच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्या कार्यरत आहेत. वैशाली यांचे वडील सुधाकर खेडकर वयाच्या ८०व्या वर्षीही मल्लखांब खेळतायेत. एवढच नाही तर वैशाली यांचा मुलगा शार्दूल ही मल्लखांबाचे धडे गिरवत यात काही करू पाहतो आहे. वेगळा ध्यास घेत काहीतरी साध्य करू पाहताना कुटुंबही जेव्हा त्यात सहभागी होते तेव्हा तो अविष्कार अधिकच व्यापक होतो.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला
कलाशीर्वाद लाभलेलं हे कुटुंब सध्या मल्लखांबासारख्या मराठमोळ्या खेळामध्ये रंगलंय. मल्लखांबाच्या अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत, रशियात भारताचे प्रतिनिधित्व करून अनेक सन्मान वैशाली यांनी मिळवले आहेत. वैशाली यांचे वडील आणि मुलगा यांनीही अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
मैदानात आम्ही एकमेकांचे स्पर्धक
नुकत्याच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे घेतल्या गेलेल्या उज्जेन येथे झालेल्या ‘खेलो इंडिया २०२३’ या स्पर्धेत दोन रौप्य आणि एक कास्य पदक शार्दूलने मिळवलं आहे. माझे आजोबा माझ्या आईसाठी प्रेरणा ठरले तर माझी आई माझ्यासाठी.आमचं नातं आई मुलाचं असलं तरी मैदानात आम्ही एकमेकांचे स्पर्धक आणि मार्गदर्शक असल्याचं तो सांगतो.