हरिद्वार : देशातील दिग्गज कुस्तीपटूंचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या कुस्तीपटूंनी खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पण सरकारकडून खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे हे खेळाडू आज चांगलेच आक्रमक झाले. सरकारने आपल्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी हे कुस्तीपूट आज थेट हरिद्वारला गंगा तिरावर दाखल झाले. त्यांनी आपली सर्व पदकं गंगा नदीच्या पात्रात विसर्जित करण्याचा निर्णय घेतलेला. त्यासाठी ते आज संध्याकाळी गंगा तिरावर दाखलही झाले.
यावेळी या खेळाडूंना अश्रू अनावर झाले. ते खूप ढसाढसा रडू लागले. या खेळाडूंनी खूप मेहनत करुन पदकं जिंकली आहेत. पण आज आपल्याला ही पदकं गंगा नदीत विसर्जित करावी लागत असल्याने ते भावूक झाले. या आंदोलनात अनेक कुस्तीपटू सहभागी झाले होते. यावेळी काही शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी या खेळाडूंना समजवण्याचा प्रयत्न केला. असं केल्याने न्याय मिळणार नाही, उलट मेहनतीने कमावलेली पदकं नदी पात्रात विसर्जित होतील. त्यामुळे वेगळ्या मार्गाने लढा सुरु ठेवा, असं आवाहन करण्यात आलं.
शेतकरी नेत्यांनी केलेलं आवाहन कुस्तीपटूंनी मान्य केलं. त्यामुळे शेतकरी नेत्यांना या कुस्तीपटूंची समजूत काढण्यात यश आलं. कुस्तीपटूंनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. तसेच ते गंगा तिरावरुन परतले आहेत. त्यांनी आपली पदकं गंगा नदी पात्रात विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतल्याने अनेक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. कारण हे खेळाडू आणि त्यांनी कमावलेले पदकं हे देशाचे अभिमान आहेत. त्यामुळे त्यांनी मेहनत करुन कमावलेले पदकं नदी पात्रात सोडू नये, अशी संपूर्ण देशाची इच्छा होती.
दरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ट्विटवर भावनिक पोस्ट केली होती. “मेडल आमचा जीव, आमचा आत्मा आहे. ते गंगेत वाहून गेल्यानंतर आमचाही जगण्यात अर्थ राहणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार”, असं साक्षी मलिक म्हणाली होती.
“इंडिया गेट आमच्या शहीदांची ती जागा आहे ज्यांनी देशासाठी देह त्याग केला. आम्ही त्यांच्या इतके पवित्र तर नाही आहोत. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आमची भावना देखील त्या सैनिकांसारखीच होती”, असं साक्षी म्हणाली.
“अपवित्र तंत्र आपलं काम करतंय आणि आम्ही आमचं काम करतोय. आता लोकांना विचार करायला हवा की, ते आपल्या या मुलींसोबत उभे आहेत की या मुलींचं शोषण करणाऱ्यांसोबत, आम्ही आमचे मेडल गंगेत विसर्जित करुन टाकणार. या महान देशाचे आम्ही सदैव आभारी राहणार”, अशी भावनिक पोस्ट साक्षी मलिकने केली होती.