मुंबई : मोबाईल कंपनी अॅपलने आता मोबाईल उत्पादनाशिवाय इतरही क्षेत्रांमध्ये उतरायला सुरुवात केली आहे. त्यांनी आता थेट क्रेडिट कार्डच्या बाजारात उडी घेतली आहे. आपल्या युजर्ससाठी अॅपलने खास ‘अॅपल कार्ड’ आणले आहे.
अॅपलचे युजर आपल्या अॅपल मोबाईलमधील वॉलेटमध्ये साईन अप करून एक डिजिटल कार्ड मिळवू शकतात. या कार्डद्वारे त्यांना कोणत्याही ठिकाणी खरेदी करता येईल. या कार्डला कोणताही क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही कोड, एक्स्पायरी डेट किंवा सिग्नेचर नाही. या कार्डची सर्व माहिती अॅपल वॉलेट अॅपमध्ये साठवली जाणार आहे.
अॅपल कार्ड युजरला रिवॉर्ड म्हणून पॉईंट्स न देता थेट 2 टक्के कॅशबॅक देणार आहे. तसेच अॅपलच्या उत्पादनांची खरेदी केल्यास ही कॅशबॅक 3 टक्के असणार आहे. अॅपलच्या इतर उत्पादनांप्रमाणेच या क्रेडिट कार्डमध्येही प्रायव्हसीबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे. या कार्डद्वारे तुम्ही काय खरेदी करत आहात, कोठे खरेदी करत आहात किंवा किती खरेदी करत आहात? याविषयी आपल्याला काहीही माहिती असणार नसल्याचे अॅपलचे उपाध्यक्ष जेनिफर बेली यांनी सांगितले आहे. युजरची माहिती मार्केटिंग अथवा जाहिरात या उद्देशाने कुणालाही दिली जाणार नाही. तसेच खरेदीबाबतची सर्व माहिती अॅपलच्या सर्व्हरवर न साठवता मोबाईलवरच साठवली जाईल, असेही आश्वासन जेनिफर यांनी दिले.
नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमलाही अॅपलची टक्कर
अॅपलने या व्यतिरिक्त आपली ओरिजनल व्हिडीओ सेवाही सुरू केली आहे. अॅपलच्या नव्या अॅपल टीव्ही प्लस सेवेचा सामना बाजारात नेटफ्लिक्स, गुगल आणि अॅमेझॉनशी होणार आहे. अॅपल टीव्ही प्लस ही एक ऑन-डिमांड, अॅड-फ्री सेवा असून 100 देशांमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. तसेच त्यांनी आपल्या वर्तमानपत्र आणि मासिकासाठीही सब्सक्रिप्शनची योजना आणली आहे. कंपनीने आता डिजिटल कंटेंटवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. दुसरीकडे अॅपलने मोबाईल आणि इतर उपकरणे वापरणाऱ्यांसाठी गेम सब्सक्रिप्शन अॅपल ऑरकॅडही आणले आहे.