सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. बीएसएनएलचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त प्लॅन (cheapest plan) असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यात दीर्घ वैधता उपलब्ध असल्याने ग्राहक याकडे अधिक आकर्षित होतील असे बोलले जात आहे. बीएसएनएलने स्वस्तात दीर्घ वैधता (long validity) ऑफर करणारा एक प्लॅन लॉंच केला आहे. 321 रुपयांच्या या बजेट प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनसह ग्राहकांना एक दीर्घ वैधता मिळते. या लेखाच्या माध्यमातून बीएसएनएलच्या या धमाकेदार प्लॅनची माहिती घेणार आहोत.
बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना दर महिन्याला 250 एसएमएस देईल तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला 15 जीबी फ्री डेटाची सुविधा मिळेल. कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये लोकल कॉलसाठी 7 पैसे प्रतिमिनिट आणि एसटीडी कॉलिंगसाठी 15 पैसे प्रतिमिनिट शुल्क आकारले जाते.
मार्केटमधील कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे इतका स्वस्त प्लॅन नाही जो 321 रुपयांत 365 दिवसांची वैधता ग्राहकांना देतो. पण या प्लॅनमध्ये एक ट्विस्ट आहे. हा प्लॅन सर्व यूजर्ससाठी उपलब्ध नाही. या प्लॅनचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि कोणाला हा प्लॅन रिचार्ज करून मिळू शकतो याची माहिती कंपनीकडून सांगण्यात आली आहे. रोमिंगमध्ये इनकमिंग व्हॉईस कॉल या प्लॅनसह मोफत आहेत. अर्थात यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ही योजना बीएसएनएलने तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या पोलिसांसाठी ऑफर केली आहे, म्हणजेच जे पोलिस अधिकारी तामिळनाडूमध्ये काम करतात तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतील. हा प्लॅन बीएसएनएलच्या अधिकृत साइटवर तामिळनाडू सर्कलसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना ही योजना इतर कोणत्याही मंडळासाठी दिसणार नाही.