मुंबई : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने नवी प्रायव्हसी पॉलिसी जाहीर केली होती. या पॉलिसीला जगभरातील लाखो युजर्सनी विरोध केला होता. अनेकांनी तर आपल्या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप हटवून थेट सिग्नल अॅप सुरु केला होता. त्यामुळे व्हॉट्सअॅपला मोठा झटका बसला. त्यानंतर व्हॉट्सअॅपने सर्व नियम मागे घेत नवी पॉलिसी जाहीर करत तुमचा डेटा सुरक्षित आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर लोकांनी पुन्हा व्हॉट्सअॅपचा स्वीकार केला. आता गूगलने जीमेल सर्व्हिसबाबत नवी नियमावली जारी केली आहे. विशेष म्हणजे युजरने हे नियम मानले नाहीत तर त्यांचं जीमेल अकाउंट बंद होईल, अशी चर्चा आहे. याबाबतची खरी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Google new rule for Gmail).
नेमकं खरं काय?
जीमेलची नवी पॉलिसी स्वीकारली नाही तर तुमचं जीमेल अकाउंट बंद होणार नाही. पण नवी पॉलिसी स्वीकारली नाही तर युजरला काही सेवांचा लाभ घेता येणार नाही. यामध्ये स्मार्ट कम्पोज, असिस्टंट रिमायंडर, ऑटोमॅटिक ईमेल फिल्टरिंग यासारख्या सुविधांचा समावेश आहे. युजरला या सर्व सुविधा हव्या असतील तर जीमेलची नवी पॉलिसी स्वीकारणं बंधनकारक असेल (Google new rule for Gmail).
महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर भारताचे युजर असाल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण गुगलने सध्या फक्त यूकेच्या जीमेल युजर्ससाठी नवी नियमावली जारी केली आहे. याशिवाय भारतात नवी पॉलिसी कधी लागू करणार याबाबत गूगलकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
नव्या पॉलिसाचा फायदा आहे का?
गूगलच्या नव्या पॉलिसीनुसार युजरला आपल्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण राखता येणार आहे. नव्या फिचर्सनुसार कोणत्या प्रकारचा डेटा गूगलसोबत शेअर करायचा या प्रकारचा निर्णय युजर घेऊ शकतो. जर कुणी गूगलचे नवे नियम स्वीकार केले तर त्या युजरला पॉप-अप मेसेज येईल. युजर जेव्हा जीमेल उघडेल तेव्हा युजरला पॉप-अप मेसेज येईल.
याआधी गूगलकडून नव्या नियमांचा स्वीकार न केल्यास जीमेल, गूगल ड्राईव्ह आणि गूगल फोटोजवरील सर्व डेटा उडून जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. याशिवाय गूगलची नवी स्टोअरेज पॉलिसी पुढच्या वर्षात लागू होऊ शकते. या पॉलिसीनुसार युजर नियोजित स्टोरेजचा वापर करु शकणार आहेत. युजरला अधिक स्टोअरेजसाठी स्टोअरेज खरेदी करावा लागेल.
हेही वाचा :
WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?