मुंबई : सेमीकंडक्टर तुटवड्याची समस्या उद्भवल्यापासून भारत सरकार त्याकडे सकारात्मकतेने बघत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने पुढाकार घेत, सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोयी-सुविधा देण्यासाठी पाऊलही उचलण्यात आले होते. भारताच्या या आव्हानाला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. भारतीय कंपनी वेदांतने 60 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केल्यापाठोपाठ आता जगातील सर्वोत मोठी कंपनी इंटेलनेही भारताच्या आव्हानाला अनुकूलता दर्शवली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही अग्रगण्य कंपनी लवकरच भारतात सेमीकंडक्टकर उत्पादनात सहभागी होणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करत इंटेलच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सेमीकंडक्टर आणि चीप हे कंपोनेंट आहे जे जगातील प्रत्येक कंपनी त्यांच्या उत्पादनात वापर करते. खास करुन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि वाहन उत्पादन कंपन्यांमध्ये सेमीकंडक्टर आणि चीपची नितांत आवश्यकता आहे. या समस्येकडे भारत सरकारने संधी म्हणून बघितले आहे आणि सेमीकंडक्टर च्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टरचे संशोधन, विकासाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
चिप उत्पादनातील अग्रेसर अमेरिकन कंपनी इंटेलने भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी भारतात उत्पादन सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतात लवकरच उत्पादन युनिट सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.कंपनीचे भारतातील प्रतिनिधी रंधीर ठाकूर यांनी त्यांच्या ट्वीटमधून संवाद साधत केंद्र सरकारला साद घातली आहे. देशात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इको सिस्टीमसाठी आणि हायटेक उत्पादनाचे जागतिक केंद्र होण्यासाठी तब्बल 76 हजार कोटींच्या धोरणाला मान्यता दिली आहे. सरकारच्या या पुढाकाराचे इंटेल कंपनीने स्वागत केले आहे.
भारताच्या सेमीकंडक्टर हब तयार करण्याच्या आव्हानाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कंपन्या त्यासाठी इच्छुक आहे. वेदांत ग्रुपने त्यासाठी टप्प्याटप्यात 60 हजार गुंतवणुकीचा घोषणा केली आहे. तर इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगसोबतच टाटा ग्रुपनेही या प्रकल्पात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सेमीकंडक्टर आणि चीप उत्पादनासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जाहीर करेल. त्यानंतर तीन महिन्यातच कंपन्या या प्रकल्पातंर्गत उत्पादन सुरु करण्यासाठी अर्ज दाखल करु शकतील.
इंटेल कंपनीने अद्याप भारतात सेमीकंडक्टर उत्पादन सुरु करण्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र कंपनीने सेमीकंडक्टर हबमध्ये सहभागी होण्याविषयी अनुकूलता दाखवत इच्छाही व्यक्त केली आहे. मलेशियातील पेनांग येथे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी इंटेल कंपनीने यापूर्वीच 7 अरब डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. भारत सरकारकडून सवलतींचा पाऊस पडल्यास कंपनी भारतातही गुंतवणूक करू शकते. केंद्र सरकार अमेरिका, दक्षिण कोरीया, तैवान आणि जपानच्या सहकार्याने सेमिकंडक्टर हब तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
इतर बातम्या :