नवी दिल्ली : आजपासून कुणालाही ट्विटरवर फुकटात ब्ल्यू टिक मिळणार नाही. ट्विटरने रात्री 12 वाजल्यापासून जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे, त्यांना आता पेड सर्व्हिस घ्यावी लागणार आहे. पैसे मोजल्यानंतरच त्यांना ब्ल्यू टिक मिळणार आहे. तरच यूजर्सना व्हेरिफाईड अकाऊंट मिळणार आहे. ट्विटरने काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खानसह विराट कोहलीच्या ट्विटर अकाऊंटचीही ब्ल्यू टिक हटवली आहे.
टेस्लाचे एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं आहे. ट्विटरच्या खरेदी नंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता ट्विटरसाठी ब्ल्यू टिक हवी असेल तर पेड सर्व्हिस घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. जे लोक पैसे मोजतील त्यांनाच ब्ल्यू टिक मिळेल. कुणालाही ब्ल्यू टिक मोफ त मिळणार नाही, असं मस्क यांनी 12 एप्रिल रोजीच स्पष्ट केलं होतं. तसेच 20 एप्रिलच्या रात्रीपासून मोफत ब्ल्यू टिकची सर्व्हिस बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी आहे किंवा आपली ब्ल्यू टिक सर्व्हिस कायम ठेवायची आहे त्यांना आता ट्विटर ब्ल्यूचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन 650 रुपयांपासून सुरू होतं. मोबाईल यूजर्ससाटी दर महिन्याला 900 रुपये भरावे लागणार आहेत.
ट्विटर ब्ल्यू सब्सक्रिप्शननंतरही एलन मस्क थांबणार नाहीत. ट्विटर खरेदी करण्यासाठी त्यांनी प्रचंड पैसा खर्च केला आहे. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. बऱ्याच काळापासून ट्विटर नफ्यात नाहीये. त्यामुळेच नवा निर्णय घेऊन त्यांनी पैसा वसूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ट्विटरने भारतासहीत या आधीच अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पेड सर्व्हिस सुरू केली आहे. या देशांमधील नागरिकांनी ट्विटरची पेड सर्व्हिस घेण्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे.
भारतात अनेकांची ब्ल्यू टिक हटवण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रिमो मायावती, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप आमदार नितेश राणे, क्रिकेटपटू विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार आदींची ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.