शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

ठाणे : मोबाईल मार्केटमध्ये सध्या शाओमीच्या फोनची क्रेझ आहे. एका एका फोनसाठी महिना महिना वेटिंगवर रहावं लागतं. पण या शाओमीच्या फोनच्या प्रेमात असाल तर जरा थांबा. कारण, ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये शाओमीच्या फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटानंतर घराला आग लागली आणि घरातले सर्व जण जखमी झालेत. शहापूरमधील शिंदे कुटुंबीयांच्या घरात MI च्या मोबाईलचा […]

शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान
Follow us on

ठाणे : मोबाईल मार्केटमध्ये सध्या शाओमीच्या फोनची क्रेझ आहे. एका एका फोनसाठी महिना महिना वेटिंगवर रहावं लागतं. पण या शाओमीच्या फोनच्या प्रेमात असाल तर जरा थांबा. कारण, ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये शाओमीच्या फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटानंतर घराला आग लागली आणि घरातले सर्व जण जखमी झालेत.

शहापूरमधील शिंदे कुटुंबीयांच्या घरात MI च्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात घरात चहुबाजूंनी आग पसरली. आगीत राजू शिंदे (वडील), रोशनी शिंदे (आई), ऋतुजा शिंदे (मुलगी) तर अभिषेक शिंदे (मुलगा) असे शिंदे परिवारातील चौघेही जखमी झाले.

घरातील फर्निचरसह वॉशिंग मशीन, फ्रिज, कपाट मुलांचे शालेय दप्तर, कपाटातील सर्व कपडे जळून खाक झाले आहेत. फोनच्या स्फोटामुळे शिंदे परिवाराचं लाखोंचं नुकसान झालंय. तर स्फोटामुळे पूर्ण बिल्डिंग हादरली असून त्यांच्या खिडकीच्या काचा शेजारी असलेल्या फ्लॅटमध्ये उडाल्या.

शहापूर तालुक्यातील कासार अलीमध्ये हे शिंदे कुटुंबीय राहतं. रात्री झोपताना अभिषेक शिंदे यांनी आपला Mi कंपनीचा मोबाईल चार्जिंगला लावला आणि रात्री झोपले. त्यानंतर सकाळी चार्जिंगला लावलेल्या Mi कंपनीच्या मोबाईलचा स्फोट इतका भयानक झाला, की त्यामुळे घरात आग लागली आणि आतमध्ये कोंडलेले कुटुंब ओरडू लागलं.

यानंतर शेजारील मंडळी धावून आली आणि अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढलं. घरातील पाणी आणि बाहेरील मातीने लागलेली आग विझवली आणि आगीत जखमी झालेल्या कुटुंबाला रुग्णालयात हलवलं. मात्र शाओमी कंपनीच्या मोबाईल स्फोटात शिंदे कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. स्फोट इतका भीषण होता, की घरातील पंख्याचे पातेही वाकले आहेत, तर भिंती काळ्या पडल्यात.