नवी दिल्ली : लेह-लडाखला (Leh and Ladakh) चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरने (Twitter) भारताच्या संसदीय समितीची लेखी स्वरुपात माफी मागितली आहे. ट्विटरने याबाबत म्हटले आहे की, “30 नोव्हेंबरपर्यंत आम्ही आमची चूक सुधारू”. (Twitter has apologised for wrongly showing Leh and Ladakh as part of China)
भाजप खासदार मीनाक्षी लेखी याबाबत म्हणाल्या की, “ट्विटरच्या चीफ प्रायव्हसी ऑफिसरने पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आम्हाला आमची चूक मान्य आहे. लडाखचा काही भाग चुकीच्या जियो-टॅगिंगमुळे चीनचा भाग असल्याचे दाखले गेले आहे. आम्ही ही चूक दुरुस्त करत आहोत, त्यासाठी आम्हाला 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतचा वेळ लागेल”.
ट्विटरवर भारताचा भाग चीनमध्ये दाखवण्यावरुन भारताने तीव्र आक्षेप घेत ट्विटरला सुनावलं होतं. या प्रकरणी भारत सरकारचे आय टी सचिव अजय साहनी यांनी ट्विटरचे सीईओ जॅक डोरसी यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात साहनी यांनी ट्विटरला कठोर इशारा दिला होता, तसेच ट्विटरच्या अशा कृतींमुळे ट्विटरची केवळ प्रतिष्ठा कमी होत नाही, तर तटस्थता आणि निष्पक्षपणा यावरही प्रश्न उपस्थित होतात, असे म्हटले होते.
ट्विटरने 18 ऑक्टोबरला आपल्या प्लॅटफॉर्मवर लेहचं जिओ-टॅग लोकेशन चीनच्या ताब्यातील जम्मू काश्मिरमध्ये दाखवलं होतं. यानंतर भारताच्या आय टी सचिवांनी ट्विटरला लेह भारताचा केंद्रशासित प्रदेश लडाखची राजधानी असल्याचं स्पष्ट केलं. तसेच हे ट्विटरला माहिती असायला हवं, असंही सुनावलं. लडाख आणि जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. या भागात भारताच्या संविधानाप्रमाणे काम होत असल्याचंही ट्विटरला सांगण्यात आलं होतं.
भारताचा कोणताही अपमान सहन करणार नाही : अजय साहनी
अजय साहनी म्हणाले होते की, “ट्विटरने भारतीय नागरिकांच्या भावनांचा सन्मान करावा. नकाशातून दिसणारी भारताची अखंडता आणि स्वायत्तता यावर ट्विटरकडून होणारा अपमान भारत सहन करणार नाही. हे कायद्याचंदेखील उल्लंघन आहे.”
भारताने ट्विटरच्या या कृतीवर आक्षेप घेत पाठवलेल्या पत्राची ट्विटरकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. तसेच ट्विटर भारत सरकारसोबत काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा आम्ही सन्मान करतो, असं ट्विटरने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
‘लेह चीनचा भाग नाही, तर भारताच्या लडाखची राजधानी’, चुकीच्या GEO टॅगवरुन भारतानं ट्विटरला सुनावलं
(Twitter has apologised for wrongly showing Leh and Ladakh as part of China)