आपल्याला लागणारी प्रत्येक गरजेची गोष्ट बाजारात पैसे देऊन मिळते. पण मिळत नाही तो माणूस. माणसांना कुणी विकत घेऊ शकत नाही, म्हणूनच चांगल्या स्वभावाने आणि आपल्या कर्माने माणसं कमवावी लागतात असं म्हटलं जातं. कपडे असो वा खाद्यपदार्थ, प्रत्येकाची किंमत लावता येते, पण माणसांची किंमत करता येत नाही. पण कुणी स्वत:ला बाजारात विक्रीसाठी काढलं तर? हा प्रश्न कदाचित थोडा चुकीचा वाटेल, पण हे खरंय. नुकतंच नायजेरियात असंच काहीसं पाहायला मिळालं, जिथं एक माणूस स्वतःला विकण्यासाठी रस्त्यावर उतरला (A 28-year-old Nigerian man has sold himself out of poverty).
गरीबीमुळे स्वत:ला विकण्याचा निर्णय
जगात दररोज कुठल्या ना कुठल्या विचित्र घटना घडत असतात. त्यातीलच ही एक घटना, ज्यामध्ये एका 26 वर्षाच्या तरुणाने आपल्याला विकायला काढलं आहे. अलियु ना इद्रिस असं याचं नाव. तो एक शिंपी आहे, अतिशय गरीबीत राहून अलियु मोठा झाला. पण, अजूनही त्याच्या कुटुंबाची गरीबी संपलेली नाही. 2 वेळच्या जेवणापुरतंही कमावणं त्याच्याने शक्य होत नाही. यामुळे, अलीयूने स्वत:ला विकण्याचा विचार केला. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये, अलियू कॅरो शहरात एक बोर्ड घेऊन रस्त्यावर उभा राहिला. साइन बोर्डवर लिहिलं होतं – “हा व्यक्ती 37 लाख रुपयांना विकण्यास आहे.” या साइन बोर्डवर त्यांनं खाते क्रमांक आणि फोन नंबरही लिहिला होता.
आधीही स्वत:ला विकण्याचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, तो पूर्वी कदुना शहरात स्वत: ला विकण्यासाठी गेला होता, पण तिथं त्याला कुणीही विकत घेतल नाही. त्यामुळे त्याने कॅरोत येण्याचा निर्णय घेतला. अलियुने सांगितले की, तो गरिबीमुळे इतका त्रस्त झाला होता की, त्याने स्वत:ला विकण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या पैशांपैकी अर्धे पैसे तो त्याच्या आई-वडिलांना देणार असून आणि बाकीचे पैसे त्याच्या खर्चासाठी ठेवणार आहे.
अलियुला याआधी अटक
जरी अलियु स्वत:ला विकण्यास निघाला असला तरी कायद्यानुसार हे शक्य नाही. अलीयू इस्लाम धर्माचा अनुयायी आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्यावर इस्लामिक पोलिस हिस्बाहने त्याला धर्माविरुद्ध काम केल्यामुळे अटक केली. हिस्बाच्या एका कमांडरने बीबीसीला सांगितले की, स्वत:ला विकणे इस्लामच्या विरोधात आहे, मग तो कितीही त्रास सहन करत असला तरी तो स्वत: कुणाचा गुलाम बनवू शकत नाही. दुसरीकडे अशीही माहिती समोर आली आहे की, अलियुसाठी काही ऑफर आल्या होत्या. मात्र खरेदीदार एवढी मोठी रक्कम देण्यास तयार नव्हते. पोलिसांनी अलियुला आता सोडलं असून तो पुन्हा बाहेर पडला आहे.
हेही वाचा: