बांगलादेशातील पीएम हाऊसमधून बॅग नेणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल, बॅगची किंमत ऐकून थक्क व्हाल?

| Updated on: Aug 07, 2024 | 7:50 PM

सोमवारी आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घराकडे कुच केली आणि घरावर ताबा मिळवला. लोकं घरात घुसण्याच्या आधीच शेख हसीना यांनी घर सोडलं होतं. त्यामुळे आंदोलकांनी घरातील अनेक वस्तूंची लूट केली. सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला बॅग घेऊन जाताना दिसत आहे.

बांगलादेशातील पीएम हाऊसमधून बॅग नेणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल, बॅगची किंमत ऐकून थक्क व्हाल?
Follow us on

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडला. सध्या त्या भारतात आहेत. इतर देशात आश्रय घेण्याचा त्यांचा विचार आहे. पण अजून कोणत्याही देशाने त्यांना हिरवा कंदील दिलेला नाही. पण येत्या १-२ दिवसात ते भारतातून इतर देशात जाऊ शकतात. बांगलादेशात अजूनही हिंसा सुरुच आहे. अनेक ठिकाणी दुकाने लूटली जात आहेत. इतकंच नाही तर पंतप्रधानांच्या निवासस्थानातून देखील लोकांनी वस्तू चोरी करुन नेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेल्या आंदोलनांमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना आपला देश सोडावा लागला. आता लष्कराकडून लवकरत काळजीवाहू सरकार स्थापन केलं जाणार आहे. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

बांगलादेशात हिंसा इतकी पसरली आहे की, दुकाने लुटली जात आहेत. आतापर्यंत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी जेलवर देखील हल्ला केला. ज्यातून 500 कैदी फरार झाले आहेत. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर देखील ताबा मिळवला. लोकांनी घरातील कोणतीच गोष्ट सोडली नाही. घरातील वस्तूंचे नुकसान तर केलेच पण वस्तू चोरी करुन देखील नेल्या. लोक खुलेआम पीएम हाऊसची लूट करत होते. कुणी एसी बाहेर काढत होता, तर कोणी कपडे घेऊन पळत होता. या दृश्यांनी अराजकतेची परिसीमा ओलांडली होती.

डायर बॅग घेऊन जाणाऱ्या महिलेचा फोटो व्हायरल

दरम्यान, एका महिलेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती डायर सूटकेस घेऊन जाताना दिसत आहे. निळ्या सूटमधील महिलेच्या चेहऱ्यावर हास्य आहे. ती आंदोलकांमध्ये उभी होती. सोशल मीडियावर या फोटोबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

डायर बॅगच्या किंमतीवर चर्चा

सोशल मीडियावर बॅगच्या किमतीवरही चर्चा सुरु आहे. लोकं वेगवेगळा अंदाज लावत आहेत. काहींच्या मते, त्याची किंमत अंदाजे £2510.76 आहे, जी बांगलादेशी टाकामध्ये 3,76,343.14 आहे. जर आपण याचे रुपांतर भारतीय रुपयात केले तर ते ₹2,63,630 इतके आहे.

डायर पिशव्या बनविण्याचा आणि विक्रीचा खर्च

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, डायरला एक बॅग बनवण्यासाठी 53 युरो (रु. 4,778) खर्च येतो, जो तो स्टोअरमध्ये 2,600 युरो (2.34 लाख रुपये) मध्ये विकतो. डायर हा जगातील आघाडीच्या लक्झरी ब्रँडपैकी एक आहे, जो त्याच्या रेडी-टू-वेअर कलेक्शनसाठी प्रसिद्ध आहे.