मुंबई : आपल्या देशात प्राणी मित्रांची संख्या वाढते आहे. अनेक जण आपल्या घरामध्ये पाळी कुत्रा किंवा मांजर पाळण्याचा आपला छंद जोपासत आहेत. सार्वजनिक ठिकाणी (Public Place) ही प्राण्यांना खाद्यपदार्थ देणारे आपण प्राणी मित्र पाहायला मिळतात. मग तो रस्ते प्रवास असो किंवा रेल्वे प्रवास (Railway Travelling) अनेकांची भूतदया थक्क करणारी असते. अशाच एका प्रसंगात रेल्वेच्या सीटवर बसलेल्या कुत्र्याला माणुसकी (Humanity) अनुभवायला मिळाली.
प्रवाशांसाठी असलेल्या सीटवर कुत्रा बसला होता. इतर सीटही फुल्ल झाल्या होत्या. मात्र सीटवर झोपलेल्या कुत्र्याला हाकलण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. प्रत्येकाने आपल्या मनातील प्राणी प्रेम जपत त्या कुत्र्या प्रति संवेदना दाखवली.
सीट न मिळाल्याने प्रवासी रेल्वेत उभे राहिले. त्यांची ही भूतदया पाहून रेल्वेतील अन्य प्रवाशांचाही हृदयाला पाझर फुटला नसेल तर नवलच.
कुत्रा निवांत झोपलाय आणि इतर प्रवासी सीट न मिळाल्याने उभे आहेत, या रेल्वेतील प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. एरव्ही सीट मिळवण्यासाठी रेल्वे पकडताना जीवघेणी स्पर्धा करणारे प्रवासी एका कुत्र्यासाठी मात्र स्तब्ध उभे कसे राहिले?
व्हिडिओमधील हा प्रसंग पाहून सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जाऊ लागल्या आहेत. ज्या प्रवाशांनी कुत्र्याप्रती संवेदना दाखवल्या, त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे.
स्टेफानो मॅगी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ तब्बल 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
मुंबईच्या लोकलमध्ये सकाळी आणि सायंकाळच्या पिक अवर्समध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यावेळी चौथी सीटही मिळाली तरी प्रवाशांना आकाशाला हात लावल्याचा आनंद मिळतो.
पण सध्या ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुत्र्याने एक नव्हे, तर दोन सीट अडवून निवांत झोप घेतली आहे. अशा परिस्थितीतही प्रवाशांनी दाखवलेला संयम कौतुकाचा विषय ठरला आहे.