माणूस घरात कुत्रा, मांजर, घोडा पाळतो. त्याची ही एक ठरलेली संख्या असते. एक, दोन फार फार तर तीन? त्यापेक्षा जास्त प्राणी कधी पाळले जाऊ शकतात का? सगळ्यात महत्त्वाचं या प्राण्यांमध्ये झुरळ पाळलं जाऊ शकतं का? एक नाही दोन नाही, एक लाख झुरळं? कल्पनेच्या बाहेर आहे नाही का? एक अशी स्त्रीही आहे जिने आपल्या घरात एक लाख झुरळं आणि तीनशेहून अधिक जनावरं ठेवली आहेत. या महिलेने एका दिवसात नाही तर अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर हे केले आहे. दरम्यान या महिलेला अटक करण्यात आलीये.
वास्तविक, ही महिला अमेरिकेतील एका शहराची रहिवासी आहे. एनबीसीच्या रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव कॅरिन कीज असून या महिलेला प्राण्यांची खूप आवड होती.
तिचं हे प्राणीप्रेम बघून तिचे मित्र तिला ‘स्नो व्हाइट’ म्हणायचे. तिने हळूहळू आपल्या घरी प्राणी पाळण्यास सुरुवात केली.
तिच्या घरात इतकी जनावरं होती की, तिला स्वतःलाही ही संख्या इतकी असेल असं वाटलं नव्हतं. तिच्या घरात जवळपास एक लाख झुरळं होती.
रिपोर्ट्सनुसार ही महिला स्वत:ला सामाजिक कार्यकर्ती म्हणवून घेत असे आणि इतरही काही लोक तिच्या घरात आश्रित म्हणून राहत होते.
पण हळूहळू त्या महिलेच्या घरात इतका गोंधळ उडाला की तिच्या घरात दुर्गंधी येऊ लागली. दरम्यान, एक दिवस अचानक कोणीतरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक तिच्या पोहोचले.
घरातून दुर्गंध येत असल्याचं पोलिसांच्या पथकाच्या लक्षात आले. पोलीस पथकानं तपास सुरू केला तेव्हा सगळेच अवाक झाले. या महिलेच्या घरी 118 ससे, 150 पक्षी, सात कासवे, तीन साप आणि 15 मांजरींसह एक लाखाहून अधिक झुरळे आढळली.
पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या घरातील हवा इतकी हानिकारक होती की कोणीही जास्त काळ आत राहू शकत नव्हते.
सध्या या महिलेला अटक करण्यात आलीये. तिच्यावर प्राण्यांवर खूप अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, या महिलेला अटक केल्यानंतर तिच्या मित्रांनी तिचा बचाव करत ती प्राणीप्रेमी असल्याचे सांगितले.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून प्राण्यांनाही संबंधित विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे.