पश्चिम बंगाल : 18 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण देशभरातील जनता या ऐतिहासिक दिवसाची प्रतीक्षा करतेय. या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं आहे. 22 जानेवारीला जरी अयोध्येत रामभक्तांची तुफान गर्दी होणार असली तरी त्यानंतरही अयोध्येत जाऊन नव्याने बांधलेलं राम मंदिर पाहण्यासाठी अनेकांनी प्लॅन्स केले आहेत. तर काहीजण अनोख्या पद्धतीने प्रभू श्रीराम यांच्याप्रती आपली भक्ती दाखवत आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या एका तरुणाने असा कलाविष्कार दाखवला आहे, जो पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.
या तरुणाने पार्ले-जी बिस्किटांपासून राम मंदिराची छोटी प्रतिकृती बनवली आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिस्किटांपासून राम मंदिराची प्रतिकृती बनवणाऱ्या या तरुणाचं नाव छोटन घोष असं आहे. चार बाय चार फूटची ही प्रतिकृती बनवण्यासाठी त्याने 20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर केला. तर हे मंदिर बनवण्यासाठी त्याला पाच दिवस लागले. या प्रतिकृतीमध्ये बिस्किटांसोबतच थर्माकोल, प्लायवूड आणि डिंकाचा वापर केला आहे. ही प्रतिकृती इतकी सुंदर बनवली आहे की त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास दोन कोटींपेक्षाही जास्त व्ह्यूज आणि 26 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी ‘जय श्रीराम’ असं लिहिलं आहे. ‘कमालीची प्रतिभा आहे ही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘याची जितकी प्रशंसा करावी तितकं कमी आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी पार पडणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची असंख्य रामभक्तांची इच्छा आहे. मात्र प्रत्येकालाच त्यादिवशी तिथे उपस्थित राहता येणार नाही. म्हणून आपल्या कलेच्या माध्यमातून काहींनी प्रभू श्रीराम यांच्याप्रती असलेली भक्ती दाखवून दिली आहे. हे मंदिर असंख्या रामभक्तांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच 22 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. विविध क्षेत्रातील जवळपास 8 हजार नामांकित व्यक्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.